भारतीय क्रिकेट संघात संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा उत्कृष्ट मिलाफ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९: आयसीसी मेन्स टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल  विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एक अपवाद वगळता सर्व सामने जिंकत वर्चस्व गाजविले. संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा उत्कृष्ट मिलाफ संघात पाहायला मिळाला. या कामगिरीबद्दल भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव तसेच प्रशिक्षक गौतम गंभीर यासह सर्व संघाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी संमत केल्याचे घोषित केले.

विशेष अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय क्रिकेटचा गौरवशाली इतिहास कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने 1983 मध्ये लॉर्ड्स येथे पहिला विश्वचषक जिंकल्यापासून सुरू झाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता 2024 आणि 2026 मध्ये पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकून भारताने क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे मुंबईचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्राने भारतीय क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले असून ग्रामीण आणि सामान्य कुटुंबांतील खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय) यांच्या कार्याचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. विधानसभेच्या वतीने भारतीय संघाला अभिनंदनाचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कालच्या अंतिम सामन्यातील या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकत नवा इतिहास रचला असून तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. तसेच सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरीही भारताने प्रथमच केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 20 षटकांत 5 बाद 255 धावांचा विक्रमी डोंगर उभा केला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा आजपर्यंतचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव 159 धावांत गुंडाळत शानदार विजय मिळविला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. फलंदाज संजू सॅमसन यांनी 46 चेंडूत 89 धावा करून संघाला मजबूत सुरुवात दिली. तसेच अभिषेक शर्मा यांनी अवघ्या 21 चेंडूत 52 धावा करत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकांपैकी एक नोंदविले. इशान किशन यांनी 25 चेंडूत 54 धावा करत धडाकेबाज फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनीही महत्त्वपूर्ण धावा जोडून संघाची धावसंख्या भक्कम केली. गोलंदाजीत जसप्रित बुमरा यांनी चार बळी घेत निर्णायक कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक किफायतशीर गोलंदाज म्हणून त्यांनी संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. उपांत्य फेरीत त्यांच्या निर्णायक गोलंदाजीमुळे सामना भारताच्या बाजूने फिरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच अक्षर पटेल यांनी तीन बळी घेत संघाला महत्त्वाची साथ दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

००००

नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *