वांगणी येथील रुग्णालयात अप्रमाणित औषध खरेदी प्रकरणी संबंधितांची विभागीय चौकशी -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. ९ – ठाणे जिल्ह्याच्या वांगणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बुरशी लागलेली औषधे आढळल्याप्रकरणी खरेदीशी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करुन दोषी आढळल्यास त्यांचे निलंबन करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य किसन कथोरे यांनी सहभाग घेतला.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, वांगणी येथील रुग्णालयातील औषधांची खरेदी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेली आहे. १५ डिसेंबर २५ रोजी येथील औषधांचे नमुने घेण्यात येऊन शासकीय प्रयोगशाळांमधून त्याची तपासणी करण्यात आली. या औषधांमध्ये बुरशीजन्य संक्रमण आढळून आले नाही. तथापि इतर निकषांनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या यंत्रणेने सदर औषध अप्रमाणित असल्याचे घोषित केले आहे. या प्रकरणी औषधांना योग्य ठरविलेल्या प्रयोगशाळेला काळ्या यादीत टाकण्यात येईल. त्याचप्रमाणे खरेदीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करुन दोषी आढळल्यास निलंबन करण्यात येईल. यापुढे असे प्रकार घडू नयेत आणि गुणवत्तापूर्ण औषधे खरेदी केली जावीत यासाठी लवकरच ड्रग डिटेक्शन मशीनचा उपयोग केला जाईल असे त्यांनी सांगितले.
वांगणी येथील रुग्णालयाची दर्जोन्नती करण्यासंदर्भात सर्व निकषांचा आढावा घेऊन प्राधान्याने विचार केला जाईल, असेही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
०००००
महिला आयोगासाठी निधीची कमतरता नाही – महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
मुंबई, दि. ९ – राज्य महिला आयोगाच्या मागणीनुसार शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो. निधीची कमतरता भासू दिली जात नाही, असे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले. आयोगास मागणीनुसार दरवर्षी निधी वाढवून दिला जात असून यावर्षी १८ कोटी ३५ लाखांची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाकरिता एकूण ३५ पदे मंजूर असून त्यापैकी नियमित १८ आणि बाह्ययंत्रणेद्वारे १७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आयोगातील कोणतेही पद रिक्त नाही. आयोगाचा नवीन आकृतीबंध आराखडा मंत्रिमंडळासमोर मांडला आहे. आराखडा मंजुरीनंतर वाढीव कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी एक पोर्टल लाँच करण्यात आले आहे. या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे निराकरण करण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
०००००
बी.सी.झवर/विसंअ