‘गेटवे ऑफ इंडिया’च्या साक्षीने भारत–फ्रान्स संबंधांना नवी झळाळी

‘इंडिया–फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमानिमित्त भव्य ध्वनी-प्रकाश शो

मुंबई, दि १७ :- गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी ‘इंडिया–फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमानिमित्त सायंकाळी भव्य ध्वनी-प्रकाश शोचे आयोजन करण्यात आले. फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने भारत–फ्रान्स मैत्रीचे नवे पर्व उजळून निघाले.

या कार्यक्रमास राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

अरबी समुद्राच्या अथांग पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया परिसरात साकारलेल्या या नेत्रदीपक ध्वनी-प्रकाश कार्यक्रमातून भारत आणि फ्रान्सच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि परंपरांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास चालना मिळणार असल्याचे याव्दारे अधोरेखित झाले.

यावेळी देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

———-000———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *