छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धन, जतन आणि ज्ञाननिर्मिती उपक्रमांना वेग देण्यात यावा. भाषा संवर्धनाचे उपक्रम राबवावे,असे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सामंत यांनी आज मराठी भाषा विभागाचा आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, सहा. संचालक मराठी भाषा संचालनालय बाबासाहेब जगताप आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, संपूर्ण मराठवाडा विभागात मराठी भाषा संवर्धन आणि जतन उपक्रमांना वेग देण्यात यावा. तसेच यासंदर्भात विद्यार्थी वर्गात अधिकाधिक माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करावे. मराठीला जागतिकस्तरावर शासन प्रयत्न करीत आहे. पुणे येथे दि.३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशातील अन्य राज्यात तसेच विदेशात मराठी भाषिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरही मराठी राजभाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अशा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश श्री. सामंत यांनी दिले.
The post मराठी भाषा संवर्धन उपक्रम राबवावे- मराठी भाषा मंत्री उदय सामंत first appeared on महासंवाद.