छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून दोन दिवसापूर्वीच याची अधिसूचना राज्याला प्राप्त झाली आहे. मराठी भाषा जनमानसात आणि व्यवहारात संवर्धन करुन रुजविण्यासाठी विद्यापीठ महाविद्यालय यांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
‘अभिवंदन अभिजात माय मराठीचे’ हा सोहळा आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे,कुलसचिव प्रशांत अमृतकर, संत विद्यापीठाचे संचालक प्रवीण वक्ते, मराठी विभाग प्रमुख दासू वैद्य, प्रा. कैलास अंभोरे आदी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले की मराठी साहित्य, साहित्यिकांचे योगदान हे मराठी लाअभिजात भाषा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. मराठी भाषा सुदृढ करण्याचा संकल्प मराठी भाषा विभाग करत आहे. यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये दि.१४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. पुढील वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये विदेशात राहणाऱ्या मराठी भाषिकांना आमंत्रित करण्यात येईल. तसेच इतर प्रदेशांमध्ये भाषा संवर्धनाचे काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल. विद्यापीठ शाळा महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घ्यावा. शिक्षक प्राध्यापक यांनी ही जबाबदारी पार पाडावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठाप्रमाणेच राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ही मराठी भाषेच्या प्रचाराने प्रचारासाठी काम करण्याचे नियोजन शासनस्तरावर करण्यात येत आहे,असे श्री. सामंत यांनी सांगितले. मराठी मातृभाषा असल्याचा अभिमान आपण बाळगावा. आत्मविश्वासाने मराठी भाषेचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून दिले जावे. याशिवाय विविध कला प्रकारांची जोपासना करुन त्याद्वारे मराठी भाषेचे संवर्धन होत असते. अशा लोककला प्रकारांचेही संवर्धन याद्वारे करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी विद्यापीठाला मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात किमान एक कार्यक्रम घेऊन पार पाडली जाईल असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. अक्षर हंडी फोडून उद्घाटन करण्यात आले. राज्यगीत गायनाने अभिजात माय मराठीच्या अभिवंदन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. पंडित विश्वनाथ दाशरथे यांनी ‘मराठी असे आमची माय भाषा’ या गीताचे गायन केले. रामानंद उगले यांनी गण सादर केले. विद्यापीठातील योगशास्त्र विभागामार्फत अभिजात माय मराठी भाषा यावर सादरीकरण करण्यात आले. मराठी स्वाक्षरीसाठी फलक लावण्यात आला होता. त्यावर मान्यवरांनी मराठी भाषेतून स्वाक्षरी केली. कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी, अभ्यासक उपस्थित होते.
०००००
The post मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा – मराठी भाषा मंत्री उदय सामंत first appeared on महासंवाद.