खारघर येथे “हिंद-दी-चादर” शहिदी समागमात भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संगम

नवी मुंबई, दि.२८ : खारघर नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित समागमात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.

समागमस्थळी अखंड कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. रागी जत्थेदारांच्या कीर्तनात भाविक भावनिकरित्या तल्लीन झालेले दिसत होते. विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी स्क्रीनमुळे प्रत्येक भाविकाला कीर्तनाचा लाभ घेता आला.

‘विरासत-ए-सीख’ या प्रदर्शनातून शीख समाजाचा इतिहास, शौर्यगाथा आणि परंपरा सचित्र स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू असून सर्व धर्मीयांना प्रेमपूर्वक भोजन दिले जात आहे. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. हजारो स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ हा संदेश  दिला जात आहे.

समागमात मुख्यमंत्री सहायता निधीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डोळ्यांची तपासणी करून मोफत देवाभाऊ चष्मे वाहनातून चष्मे  वितरित करण्याची सोयही करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. बंजारा व लबाना समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.

शिखांची पारंपरिक मार्शल आर्टची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली. ३३ पार्किंग स्थळे, मोफत पिकअप-ड्रॉप सुविधा, कडक वाहतूक नियोजन, पोलीस व अग्निशामक दलाचा बंदोबस्त यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे. स्वच्छता रथ व कचरा संकलन व्यवस्था सतत कार्यरत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.

एकंदरीत, श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरत आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *