नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा झपाट्याने विकास – डॉ. विजयकुमार गावित

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

नंदुरबार, दि. १९ ( जिमाका वृत्त) – महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी उकाई धरणाचे बॅकवॉटर आपल्या राज्याच्या वाट्याला आले. ते उचलण्यासाठी कुठलीही शाश्वत अशी यंत्रणा आजपर्यंत नव्हती. परंतु हे बॅकवॉटर उचलण्यासाठी १६ लिफ्टच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग मोठ्या प्रमाणावर सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. तसेच २५ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले..

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (नाशिक) प्रशांत औटी, कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी जेरा वळवी, गणपत गावित, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, रस्ते,वीज आणि जलसिंचन या त्रिसूत्रीवर येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असून उकाई डॅमच्या बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, नवापूर आणि नंदुरबार हे तालुके सिंचनाखाली येत सुजलाम्-सुफलाम होणार आहेत. जिल्हा निर्माण झाला त्यावेळी जिल्ह्याचा निम्मा कारभार धुळे जिल्ह्यातील त्या-त्या विभागांच्या कार्यालयांमधून सुरू होता. आज मला सांगताना अतिशय आनंद होतोय की, जिल्ह्यात प्रत्येक विभागाचे स्वतंत्र कार्यालय असून काही कार्यालये अतिशय देखण्या आणि टुमदार इमारतींमध्ये जनसेवेचे काम करत आहेत. आज ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे कार्यालय उभे आहे, तेथे डोंगरदऱ्यांनी व्यापलेला निसर्गरम्य परिसर असून येणाऱ्या काळात या परिसरात स्टेडियम, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रूग्णालय, आदिवासी सांस्कृतिक भवन यासारख्या जिल्ह्याच्या विकासाला रूपेरी किनार देणाऱ्या इमारती उभ्या राहणार आहेत. एकप्रकारे नवीन नंदुरबारच या परिसरात साकारणार आहे. देखण्या वास्तूत सचोटीने आणि उर्जेने काम करण्याची प्रेरणा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात निर्माण होत असते. जिल्हा निर्मितीपासून तर आजपर्यंत प्रत्येक त्रुटींवर मात करत पुढे वाटचाल करताना असे लक्षात आले की, जिल्ह्यात शासन-प्रशासन स्तरावर अधिक कार्यक्षमतेने काम करायचे असेल तर बहुविध कनेक्टिविटी ची गरज आहे. तसेच शाश्वत स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज आहे. आपण मंत्री झाल्यानंतर ज्या विभागाने ज्या गोष्टींची मागणी केली ती तात्काळ देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचीच फलश्रुती म्हणजे ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन एक वर्षापूर्वी केले होते, त्याचे उद्घाटन व लोकार्पण आज आपण स्वत: करत असल्याचे सांगताना त्यांनी आज आदिवासी विकास विभागाकडे मागणी केल्यास ८ दिवसात निधी दिला जाईल याबाबत आश्वस्त केले. ते म्हणाले, राज्यात १५२ शासकीय आश्रमशाळा स्वत:च्या इमारती तयार होताहेत त्यातील ६३ एकट्या नंदुरबार जिल्ह्याच्या आहेत. प्रत्येक शासकीय इमारतीसोबत कर्मचारी, अधिकारी यांची शासकीय निवासस्थाने करण्यावरही आपला भर आहे.

नव्या संकल्पनांचे स्वागत आणि गतिमान कामाबद्दल अभिनंदन डॉ. सुप्रिया गावित

सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कार्यालयीन इमारत बांधकामात ज्या नवीन संकल्पना अंगीकृत करून एक देखणी आणि आगळी-वेगळी वास्तू निर्माण केली त्याबद्दल त्यांच्या नव्या संकल्पनांचे स्वागत असून, भूमिपूजनानंतर अवघ्या एका वर्षात इमारतीचे उद्घाटन करून एक गतिमान काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अभिनंदनास पात्र आहे, असे  प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी यावेळी केले.

२५ फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन डॉ. हिना गावित

नंदुरबार एका नव्या रूपात विकसित होत असून गेल्या दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या प्रगतीचे शिखरं पार करतोय. त्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राला एका शिखरावर घेऊन जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, या वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला व भूमिपूजन सोहळा २५ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे. ज्याप्रमाणे आज या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे काम गतीने आणि गुणवत्तेने झाले, त्याच गतीने प्रत्येक शासकीय इमारतीचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना तसा आदर्श घालून देण्याचे आवाहनही यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले. तसेच लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति असलेले स्वप्न साकार करण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत असल्याचेही खासदार डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *