मुंबई, दि. 10 : नायलॉन मांजामुळे राज्यात काही भागात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी सक्त कारवाई करण्यात यावी. मांजाच्या उपयोग टाळण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे पुणे, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका क्षेत्रातील नायलॉन मांजा उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, पेालीस उपायुक्त (उपक्रम) श्री. पठाण, छ. संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, ठाणे पोलीस आयुक्त प्रशांत परबकर, नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, धुळे अतिरिक्त पोलीस अधिक्षक किशोर काळे, पुणे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार, जळगांवचे अति. पोलीस अधिक्षक अशोक नकाते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
नायलॉन मांजाच्या उपयोगाबाबत जनजागृती करण्याचे सांगत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महानगरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, पोस्टर्स आदींद्वारे जनजागृती करावी. मात्र यामुळे नागरिकांचा उत्साह कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी चांगल्या संकल्पना राबविलेल्या आहेत. त्याचा अन्य महापालिका, पोलीस आयुक्त यांनी अवलंब करावा. दुचाकीला यु कमान लावण्यातबाबत तपासून घेण्यात यावे. तसेच मांजा विक्री, उत्पादन किंवा मांजामुळे घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात यावा.
वाहतूक पोलीसांनी नायलॉन मांजावरील कारवाईबाबत अलर्ट असावे. रस्त्यांवर आपत्कालीन पथकांची नेमणूक करावी. वेगात वाहन असताना मांजा गळ्याला लागून दुर्घटना झाल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशा सूचनाही यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची आणि प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली.
The post नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना first appeared on महासंवाद.