सारथी संस्थेचे १२ विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा २०२५ परीक्षेत यशस्वी

मुंबई, दि. ११ : नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर झाला त्यात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून देशाच्या विकासात आपला ठसा उमटावा अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक सूरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

सारथी, पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा-२०२५ या परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क संपूर्ण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. तसेच सारथी मार्फत यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीकरिता आर्थिक साहाय्य व मुलाखतीच्या तयारीकरिता अभिरूप मुलाखतीचे नियोजन करून विद्याथ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. यापूर्वी सारथी, पुणे मार्फत प्रायोजित संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रमातील लाभार्थी पैकी १२८ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.

सारथी, पुणे मार्फत प्रायोजित यूपीएससी उपक्रमांचा लाभ घेऊन यश मिळविलेल्या बारा विद्यार्थ्यांची रॅंक व नावे पुढीलप्रमाणे कार्तिक रवींद्र बच्छाव (१७७), हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील (३४९), कुणाल संजय अहिरराव (४३०), श्रुती संतोष चव्हाण (५२७), धनंजय संजय दिघे (५२९), अविष्कार विजय डेर्ले (५९१), अभिषेक अशोक टेकाडे (६१०), अश्विनी अरुण कोळेकर (६७५) अल्पेश भाऊसाहेब ढवळे (६८७), सूरज माणिकराव सूर्यवंशो (७०२), रामेश्वर महादु शिंदे (७०५), राजश्री शांताराम देशमुख (७५४).

००००

गजानन पाटील/स.सं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *