पोलीस पाटील संघाच्या ८व्या अधिवेशनात ग्वाही
सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवू
नागपूर, दि. ३०: राज्यातील पोलीस पाटिलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या मानधानाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देर्वेद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. तसेच पोलीस पाटिलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील हनुमान नगर भागातील डॉ. ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, परिणय फुके, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ,महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघांचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील, कार्याध्यक्ष परशुराम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, २००० वर्षांचा गौरवशाली इतिहास असणाऱ्या पोलीस पाटील या संरचनेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे हा गौरवाचा क्षण आहे. पोलीस पाटील हे गावाचे गृहमंत्री असतात कायदा सुव्यवस्थेसह या संरचनेत आता महिला सुरक्षा हा महत्वाचे कर्तव्य आहे. त्यासाठी पोलीस पाटीलांनी अधिकाराबरोबरच कर्तव्याच्या जाणीवेतून कार्य करण्याचे आवाहन केले. राज्य शासनाने या पदाला मान व मानधन मिळावा म्हणून वाढीव १५ हजार रुपये मानधन दिले. याबद्दल कृतज्ञ भाव म्हणून आजचा हा अभिनंदन सोहळाही आयोजित केला याचे अप्रुप वाटत असल्याच्या भावना श्री. फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
पोलीस पाटीलांच्या गेल्या ४ महिन्यांचे थकीत मानधन लक्षात घेता या कार्यक्रमातच श्री. फडणवीस यांनी गृह विभागाच्या अपर सचिवांना दूरध्वनीवरुन सूचना केल्या आणि येत्या २ सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असेही सांगितले.
पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ व्हावे ही मागणी योग्य असल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री व संबंधितांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर मानधन देण्याबाबत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे उपचार मिळण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पोलीस पाटलांचा पोलीस विभाग व महसुली अधिकाऱ्यांकडून अपमान होणार नाही त्यांना सन्मान मिळेल अशी कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे,परिणय फुके आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलीस पाटील संघांचे कार्य अध्यक्ष परशुराम पाटील यांनी स्वागतपर भाषण तर अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
00000