मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राज्यातील महिलांसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’

राज्यातील ITI मध्ये घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग

मुंबई, दि. 31 : आता ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात, यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच ‘हर घर दुर्गा’ या अभियानाची संकल्पना उदयास आली.

शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी  2 तासिका घेण्यात येणार असून, त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून, विद्यार्थीनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. याद्वारे मुलींचे शारीरिक बळ वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल सोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ सुद्धा सुधारेल.

याबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे. आजवर दुर्गारूपाने असंख्य महिलांनी या भूमीच्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी योगदान दिले. त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा! आज याच महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी, या उद्देशाने ‘घर घर दुर्गा अभियान’ सुरु करत आहोत. माझे महाराष्ट्रातील विद्यार्थीनींना जाहीर आवाहन आहे की त्यांनी या तासिकांचा पुरेपूर लाभ घ्यावा.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *