पर्यटनच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह विविध क्षेत्राची होणार भरभराट – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

पर्यटन धोरण-२०२४ : अॅडव्हान्टेज विदर्भ कॉनक्लेव्ह; लाख कोटी गुंतवणूक व १८ लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा

नागपूर दि.31 : राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-२०२४ अॅडव्हान्टेज विदर्भ कॉनक्लेव्ह चे आयोजन येथील दक्षिण मेट्रो एअरपोर्ट स्टेशनच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन मार्गदर्शन करत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, पेंच प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, असोसिएशनचे पदाधिकारी आशिष काळे व गिरीधर मंत्री याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचे आहे. यासाठी सर्वांना सोबत घेवून व प्रत्येक बाबीचा सर्वकष विचार करून राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन पर्यटन धोरण आणले आहे. यातून राज्यात 1 लाख कोटी गुंतवणूकीची व त्यासोबतच 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे.  विविध परिषदांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन धोरणातून विविध वित्तीय प्रोत्साहन व पुरस्कार देण्यात येत आहे. यात भांडवली गुंतवणूक, व्याज अनुदान, विद्युत देयक, स्टँम्प ड्युटी, इको टुरिझम, महिला उद्योजक, ग्रामिण पर्यटन संस्था आदी विविध बाबींवर सुट व प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. रस्ते व दळणवळणाची साधने पर्यटनवाढीसाठी आवश्यक आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशांतर्गत चांगले रस्ते निर्माण करून पर्यटनाला चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाला निसर्गाची देन लाभली असून येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पर्यटन स्थळे, गडकिल्ले, पूरातन मंदिरे आणि वने व वन्य पशू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. विदर्भात पर्यटन वाढीसाठी गुंतवणूक करून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण आणल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. पर्यटनातून विदर्भात समृद्धी व रोजगार निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून अभिनव पद्धतीने नवनवीन कल्पकतेच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. येणारा काळ पर्यटन उद्योगाचा असून पर्यटन धोरणातील वित्तीय प्रोत्साहनामुळे पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आता ‘स्काय इज द लिमीट’ प्रमाणे अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. रिसोर्ट व हॉटेल चालकांनी स्वच्छता व गुणवत्तापूर्ण सेवा आणि त्यासोबतच पार्किंग व पंचतारांकित टॉयलेट उभारण्यास प्राधाण्य देण्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला संबंधीत अधिकारी, पर्यटन व हॉटेल क्षेत्रातीत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *