‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करूया- मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि. २: आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन  ‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

वानवडी येथे कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले,  कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध योजना,  कौशल्याबाबतचे ज्ञान व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यादृष्टीने कौशल्य विकास दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ५ हजार विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

कौशल्य विकासात राज्य अग्रेसर रहावे, युवकांनी कौशल्य आत्मसात करावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी  राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर टप्प्याटप्प्याने कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येतील. या केंद्रांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना, उपक्रम राबविले जातात याची माहिती वारीतील वारकऱ्यांना, नागरिकांना व्हावी, हादेखील या दिंडीच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन भैरोबा नाला येथे वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळांच्या साथीने विठूनामाचा गजर केला आणि दिंडीत काही अंतर पायी वारी केली.

कौशल्य विकास दिंडीचे आषाढी वारी सोबत भैरोबा नाला ते गाडीतळपर्यंत आयोजन करण्यात आले. यामध्ये पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारीत संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा  सहभाग होता.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *