विधानसभा निवडणूक : मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

मुंबई, दि. २७ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने  दि.१  जुलै २०२४  या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात २५ जूलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबवण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

कार्यक्रमाचे टप्पे

पुनरिक्षण – पूर्व उपक्रम– यामध्ये दि. २५ जून  ते २४ जूलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी , मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण.

मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे इ.  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे,  नमुना १-८ तयार करणे, ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे हे कामकाज  करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण उपक्रम

या अंतर्गत दि. 25.07.2024 (गुरूवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील. तर  दि.25.07.2024 (गुरूवार ) ते दि. 09.08.2024 (शुक्रवार )दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहील. विशेष मोहिमांचा कालावधी यामध्ये दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत,मुख्य निवडणूक अधिकारी, यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार आहे. (i) दावे व हरकती निकालात काढणे

(ii) अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, (iii) डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 19.08.2024 (सोमवार) पर्यंत असून दि.  20.08.2024 (मंगळवार) रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

घरोघरी भेट देऊन पडताळणी

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, 2024 अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये घरोघरी भेट देऊन नागरिकांची माहिती गोळा केलेली आहे. तथापि, येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 मध्ये काही नागरिकांना त्यांची नावे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत. यामुळे आता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25.06.2024 ते 08.07.2024 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, 2024 दरम्यान शिल्लक राहिलेल्या घरांना गृह भेटी देणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा सार्वत्रिक निवडणूका, 2024 मध्ये मतदार यादीत नावे आढळून न आल्याबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे गृहभेटी देतील. त्या गृहभेटी दरम्यान पुढीलप्रमाणे कामकाज करण्यात येईल :-  नोंदणी न केलेले पात्र मतदार (०१ जुलै, २०२४ रोजी पात्र), तसेच  एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/ कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार आणि मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती या प्रमाणे कामकाज करण्यात येईल.

मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण

याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या दि.20 जून 2024 च्या पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचना विचारात घेवून करण्यात येणार आहे. याद्वारे मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रे निवासाच्या जवळ ठेवण्याबाबतचा प्रयत्न केला जाणार आहे.

मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणादरम्यान अति ऊंच इमारती/हौसिंग सोसायटी समूह जेथे सामान्य सुविधा असलेली जागा किंवा सभागृह त्या इमारतीच्या परिसरामध्येच तळमजल्यावर उपलब्ध आहे अशी ठिकाणे, शहरी भागातील झोपडपट्टी तसेच विस्तारीत होणारे शहरी /निम शहरी भाग यामध्ये नविन मतदान केंद्र प्रस्तावित करण्याबाबत योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

सर्व कुटुंब एकाच ठिकाणी आणि शेजारी हे एकाच विभागात असतील आणि मतदार यादीत व मतदार ओळखपत्रात एकसमानता यावी अशाप्रकारे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमात मतदार ओळखपत्र (EPICs) संदर्भातील १०० % त्रुटी दुर करण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यांचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाही, असे होऊ नये, यासाठी पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25 जुलै ते 9 ऑगस्ट, 2024 या कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी, त्यांचे नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशिल बरोबर आहे का ते तपासून घेऊन, त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत तो तपशील दुरुस्त करुन घ्यावा. यातून मतदार यादी अधिकाधिक बिनचूक होण्यास मदत होईल. दि.1 जुलै, 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत मतदार म्हणून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करु शकतात. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची ही महत्वाची संधी असल्याने पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करावी. मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी व नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी किंवा मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी पुढील दोन ऑनलाईन पर्यायांचा वापर करु शकता.

मतदार सेवा पोर्टल – http://voters.eci.gov.in/  ,  त्याचप्रमाणे वोटर हेल्पलाईन ॲप त्याचप्रमाणे आपल्या मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट देऊनही प्रत्यक्ष अर्ज भरता येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या दि.20.06.2024 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार दि.01.07.2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवार दि.25 जून, 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

मतदार यादी सर्वसमावेशक व त्रुटी विरहीत करण्यावर आयोगाचे कायम लक्ष केंद्रीत आहे.  कोणताही पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून तसेच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित राहू नये अशी आयोगाची भावना आहे. सबब त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे, जर आतापर्यंत नावनोंदणी झाली नसेल तर नावनोंदणी करून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

******

वंदना थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *