विधानपरिषद लक्षवेधी

संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन; शासन लवकरच निर्णय घेणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. १० : संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, यासंदर्भात लवकरच सर्वंकष निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, नॅशनल पार्क परिसरातील अतिक्रमणधारकांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला ११ हजार ३५९ अतिक्रमणधारकांचे दावे तपासण्यात आले असून त्यापैकी २९९ जण पात्र ठरले आहेत; मात्र त्यांचे पुनर्वसन प्रलंबित आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ हजार ४८६ अतिक्रमणधारकांच्या प्रश्नांवर विचार सुरू आहे. आरे कॉलनी परिसरातील सुमारे २० एकर जागेत आदिवासी कुटुंबांसाठी ‘ग्राउंड प्लस वन’ स्वरूपातील घरे बांधून सुमारे २,२०० कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नॅशनल पार्कबाहेरील वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधा दुरुस्त करण्यास कोणताही अडथळा आणू नये, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात येतील, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.

यावेळी सदस्य अनिल परब, चित्रा वाघ, राजेश राठोड व मनिषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

०००

राजू धोत्रे/वि.सं.अ

 

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि.१० : अमरावती शहरातील ड्रग्सविरोधी कारवायांवर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील दोन महिन्यांत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अमरावती शहरात 2021 ते 2026 या कालावधीत ड्रग्ससंबंधित 29 गुन्हे नोंदवून 101 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच नागपूर गेट पोलीस ठाण्याने सुमारे 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती ही त्यांनी दिली.

राज्यात स्थापन करण्यात आलेली अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स सक्रियपणे कार्यरत असून या पथकाला आवश्यक मनुष्यबळ व विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री यांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रग्सविरोधी कारवाया गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी केल्या जात असून या कारवाया सातत्याने आणि आक्रमकपणे सुरू राहतील, असे गृह राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/वि.सं.अ

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *