जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची कंट्रोल रुमला भेट

धुळे, दि. १२ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी सोमवार, 13 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी कंट्रोल रुम मध्ये नियुक्त पथक प्रमुखांनी सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी रविंद्र खोंडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संतोष वानखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रुमला भेट दिली. 01-नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार असल्याने या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध अहवाल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून संकलीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी 01-लोकसभा मतदारसंघ यांच्याकडे विहित वेळत सादर करावेत. साक्री व शिरपूर विधानसभा मतदार संघातील मतदाना संदर्भात मतदानासंबंधी आवश्यक माहिती, पत्रव्यवहार तसेच मतदाना संदर्भातील दर दोन तासांची आकडेवारी गोळा करुन एकत्रित अहवाल Encore प्रणालीमध्ये अद्यावत करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच मतदान पूर्व, मतदानाचे दिवशी मतदानोत्तर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या नकारात्मक बातम्यावर लक्ष ठेवून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाला वस्तुदर्शक माहिती पुरविण्यात यावी. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी व्हॉट्सअप, फेसबुक, एक्स आणि इतर सोशल मिडीयावर लक्ष ठेवून सोशल मिडीयावरील आदर्श आचारसंहितेच्या उल्लघंनाची माहिती देण्यात यावी. तसेच कंट्रोलरुम मध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन संपर्क यादी अद्ययावत ठेवून येणा-या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यात यावेत. तसेच मतदान प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या.

असे आहे कंट्रोल रुम…

लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्राचे वेब कास्टिंग करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कंट्रोल रुम तसेच मिडीया कक्षाची स्थापना करण्यात आली असून वेब कास्टिंगची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्र, मतदान प्रक्रिया, स्ट्रॉग रुमचे वेब कॉस्टिंग करण्यात येणार आहे. तसेच मतदान यंत्रे वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनावर जीपीएस मॉनिटरिंग प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. जेणेकरुन मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार उद्भवल्यास त्याची माहिती त्वरीत जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *