निवडणूक कर्तव्यावर मतदान पथके रवाना

छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):  लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तसेच १८-जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा क्षेत्रनिहाय नियुक्त मतदान पथके आज रवाना झाली.

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात २०४० तर १८ जालना मतदार संघात १०४५ मतदान केंद्रांवर ही पथके पोहोचतील. सोमवार दि.१३ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत मतदानाची वेळ आहे. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून मतदारांनी आपला हक्क बजवावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदारांना केले आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून साहित्य वितरणास प्रारंभ

आज सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपास सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे वितरण करण्यात आले. पावसाची शक्यता लक्षात घेता प्लास्टीक बॅग सुद्धा साहित्य आच्छादनासाठी देण्यात येत होती.

१०७ औरंगाबाद (मध्य) विधानसभा क्षेत्राचे साहित्य वाटप शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात, १०८ औरंगाबाद (पश्चिम)चे साहित्य वाटप शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि १०९ औरंगाबाद (पूर्व)  मतदारसंघातील साहित्य वाटप सेंट फ्रान्सिस हायस्कूल जालना रोड येथे करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरण संबंधित सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन केली पाहणी

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी या ठिकाणी भेट दिली. औरंगाबाद (पश्चिम), औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पूर्व) यांच्या साहित्य वितरण केंद्रास त्यांनी सकाळच्या सत्रात तर अन्य ठिकाणी दुपारच्या सत्रात भेट देऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली व संबंधित मतदान केंद्रावर रवाना होणाऱ्या पथकांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड ,श्रीमती अर्चना खेतमाळीस, चेतन गिरासे यांची उपस्थिती होती.

महिला मतदान केंद्र पथकांचा उत्साह

जिल्ह्यात केवळ महिला कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले १६ मतदान केंद्र तयार केले जाणार आहेत. त्यातील चार जालना लोकसभा अंतर्गत येतात तरऔरंगाबाद लोकसभा अंतर्गत १२ मतदान केंद्र असतील.  या महिला मतदान केंद्राच्या  मतदान पोलिसांसह सर्व कर्मचारी महिला नियुक्त असतील. अशा या महिला मतदान केंद्र पथकांचा विशेष उत्साह दिसून आला. या पथकासही साहित्य वितरण करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र

जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदार संघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. १९- औरंगाबाद मतदार संघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत.  विधान सभा क्षेत्र निहाय मतदान केंद्र संख्या याप्रमाणे- जालना लोकसभा क्षेत्रातील  १०४-सिल्लोड- ३५६, १०६ फुलंब्री-३५५, ११० पैठण- ३३४. १९- औरंगाबाद लोकसभा क्षेत्रातील १०५ कन्नड- ३५९, १०७ औरंगाबाद( मध्य)-३७४, १०८ औरंगाबाद(पश्चिम)-३७४, १०९ औरंगाबाद (पूर्व)-३०५, १११ गंगापूर- ३४८, ११२ वैजापूर-३३८.

३० लाख ६७ हजार मतदार

जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार (सर्व्हिस मतदारांसह) आहेत. त्यात जालना मतदार संघात १० लाख ६,४८७ तर औरंगाबाद मतदार संघात २० लाख ६१ हजार २२० मतदार (सर्व्हिस मतदारांसह) आहेत. जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आ हे. ते सर्व उपलब्ध असून  सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे, २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्यबळाची गरज असून २० हजार ५२४  कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत.

या पथकांच्या ने आण करण्यासाठी १२०४ वाहने व ३८८ बसेस वापरात आणण्यात येत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट सह मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट मशिन सह अन्य आवश्यक साहित्य, मतदान केंद्रावर लावण्यात येणारी सुचना फलके, दिशादर्शक स्टिकर्स, शाई, अन्य स्टेशनरी इ. सर्व साहित्य मतदान चमूला देण्यात आले. हे साहित्य घेऊन सायंकाळपर्यंत पथके रवाना करण्याचे कामकाज सुरु होते.

०००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *