चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया….

मुंबई, दि. १२: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २६ -मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांत १५२- बांरीवली, १५३ – दहिसर, १५४ – मागाठणे, १६० – कांदिवली, १६१ – चारकोप, १६२ – मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात १५८- जोगेश्वरी पूर्व, १५९ – दिंडोशी, १६३ – गोरेगांव, १६४ – वर्सोवा, १६५ -अंधेरी पश्चिम, १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात १५५- मुलुंड, १५६ – विक्रोळी. १५७ -भांडुप पश्चिम, १६९ – घाटकोपर पश्चिम, १७० – घाटकोपर पूर्व, १७१ मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात.  २९ – मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात १६७ – विलेपार्ले, १६८ – चांदिवली, १७४ कुर्ला, १७५ – कलिना, १७६ वांद्रे पूर्व, १७७ – वांद्रे पश्चिम या मतदारसंघाचा समावेश आहे. १७२ – अणूशक्ती नगर आणि १७३ – चेंबूर या  विधानसभा मतदारसंघाचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात होतो.

निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कसे शोधावे मतदार यादीत नाव?

VOTERS’ SERVICES PORTAL (eci.gov.in) या लिंकवर जाऊन अथवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले मतदान केंद्र, यादी क्रमांक शोधता येणार आहे. किंवा स्वत: बद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरून तुम्ही तुमचे मतदान केंद्र शोधू शकता. तसेच तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांकाद्वारेही तुमचे मतदान केंद्र आणि यादी क्रमांक शोधू शकता. तसेच व्होटर हेल्पींग ॲपद्वारेही तुम्ही मतदान केंद्र आणि यादी भाग विषयी माहिती मिळवू शकता.

व्होटर आयडी व्यतिरिक्त इतर १२ ओळखपत्रे मतदानासाठी वैध

मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,  पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक,  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत  भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,  वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे,  श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबाबत जाणून घ्या

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार त्यांच्या लोकसभा मतदार क्षेत्रातील उमेदवाराची माहिती जाणून घेऊ शकतात. Election Commission of India (eci.gov.in) अथवा या लिंकवर तुम्हाला उमेदवाराबाबत माहिती मिळेल अथवा ‘नो युवर कॅन्डीडेट’ (know your candidate) या ॲपवर माहिती मिळेल. २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २७ – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २१ उमेदवार, २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदरसंघात २० उमेदवार, २९ – उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय, ३०-दक्षिण मध्य मुंबईत १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी

या जिल्ह्यातील सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवर कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी आहे. सुट्टी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुट्टी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

उन्हाळ्यापासून बचावासाठी उपाययोजना

मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुठे संपर्क साधाल

सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच, आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही आपण मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेऊ शकता. सक्षम ॲप दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढल्यास सि-व्हीजील ॲपवर (C vigil App)तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

०००

श्रध्दा मेश्राम (स.सं)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *