राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरीबांच्या सेवेचा दिलेला संदेश शिरोधार्य मानत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल गेल्या 50 वर्षापासून सेवारत आहे. अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची प्रस्तावित नवीन इमारत उभारण्यास शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

कॅन्सर रिलिफ सोसायटी संचलित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘स्वर्गीय श्रीमती मीनाताई सिताराम जवादे’ यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते 10 बेडच्या मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.कांचन वानरे, कॅन्सर रिलिफ सोसायटीचे सचिव डॉ. अनिल मालवीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कॅन्सरचा उपचार बराच काळ चालतो व तो खर्चिक असतो. तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या 50 वर्षांपासून रुग्ण सेवेचा हा प्रवास गौरवास्पद आहे. याठिकाणी अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्ण सेवेचे हे व्रत अधिक सक्षमरित्या पार पाडता येणार आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची नवीन इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. या कामासही सुरुवात झाली आहे. नवीन इमारतीची स्थिती बघून जिल्हाधिकारी यांनी रोड मॅप तयार करावा, अशी सूचना करत ही इमारत उभारण्यास राज्य, केंद्र सरकारच्या योजना व उपक्रमाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. डॉ. अनिल मालवीय यांनी  स्वागतपर भाषण केले.

तत्पूर्वी श्री. फडणवीस यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी केली. अँटीमायक्रोबियल वॉल, सेंट्रलाइज मेडिकल गॅस पाईप लाईन, एअर फिल्टरिंग अँड कुलिंग सिस्टीम, बेडेड पॅनल आदी सुविधांनी हा अतिदक्षता विभाग सज्ज झाला आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून (सिएसआयआर फंड) आणि राहुल सिताराम जवादे यांच्या सहकार्यातून स्व. श्रीमती मीनाताई सिताराम जवादे यांच्या नावाने हा 10 बेडचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *