केंद्र आणि राज्य शासनाद्वारे महिला विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित बनविण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी देशातील ५० टक्के महिलांना मानव संसाधन क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा संदेश दिला आहे. याच दिशेने केंद्र आणि राज्य सरकार महिला विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जुना सुभेदार लेआऊट परिसरातील नागपूर महापालिकेच्या दुर्गानगर हायस्कुलमध्ये आरबीएल बँकेच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थीनींना सायकल आणि स्कूल किटचे वितरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, आरबीएल बँकेच्या सीएसआयआर फंड विभागाचे प्रमुख बालीकृष्ण नटराजन आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे समाजातील शक्तिस्वरूप घटकासाठी संकल्पबद्ध होण्याचा शुभ दिन होय. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विविध क्षेत्रात महिलांच्या सहभागावर भर दिला आहे. तसेच, महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासनासोबतच खाजगी क्षेत्रानेही या कामात आघाडी घेतली आहे. आरबीएल बँकेने मनपाच्या समन्वयाने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल व स्कूल किट देण्याचा सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे मुलींना शाळेत येण्यासाठी अडचण दूर होऊन त्यांचा मार्ग सुकर होणार असल्याचा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

बालीकृष्ण नटराजन यांनी प्रास्ताविक केले तर साधना सयाम यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते रेहमाली फातिमा, अश्मल सतफ, आरोही चिपेल आणि माही बोडगे या विद्यार्थीनींना प्रातिनिधीकरित्या सायकल व स्कूल किटचे वितरण करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *