तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाही उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सोलापूर, दि. १ (जिमाका): राज्यात १८ ते १९ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांची संख्या ही ४७ लाख इतकी आहे. सुरुवातीला यातील फक्त ३.५० लाख तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. त्यानंतर राज्यात सर्व महाविद्यालये व राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस) मार्फत मतदार नोंदणीसाठी व्यापक स्वरूपात मोहीम राबवण्यात आली व ही संख्या आज अखेर पर्यंत ११ लाख इतकी झाली आहे. तरी राज्यातील उर्वरित सर्व तरुणांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वीप नोडल पॉईंट यांच्या सोबतच्या आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. दामा यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व 18 ते 19 वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. यासाठी निवडणूक प्रशासन विद्यापीठे व महाविद्यालयांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतानाच त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांचा फॉर्मसह भरुन त्यांची नोंदणी त्याच वेळी करण्याची संकल्पना चांगली असून ती सर्व महाविद्यालयांनी अंमलात आणावी. आजचे महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण राजकीय प्रक्रियेपासून दूर गेलेले असल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन आहेत, त्यामुळे अशा तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे संसदीय लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व भारत निवडणूक आयोग त्यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला असून विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये संसदीय लोकशाही बाबत अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. देशात आठ – नऊ विद्यापीठात असे अभ्यासक्रम सुरू झालेले असून आपल्या राज्यातही विद्यापीठाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना राजकीय निवडणूक प्रक्रियेविषयी कार्यात्मक ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. भारत निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल परंतु, अशा अभ्यासक्रमासाठी कंटेंट मात्र विद्यापीठ व महाविद्यालयातील तज्ज्ञ लोकांनी तयार करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी तरुण मतदारांची नोंदणी करण्याच्या कामात खूप चांगले काम केलेले असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाच्या दिनांकपूर्वी  तीन-चार दिवस अगोदर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गृहभेटी आयोजित करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करावे. तुमच्यासाठी नाही तर आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असा आग्रह विद्यार्थ्यांनी मतदारांना करावा. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान व मतमोजणी प्रक्रियेत स्वयंसेवकाची सेवा घेण्यात येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून निवडणूक प्रक्रियेत आपले योगदान द्यावे व निवडणूक प्रक्रियेचा एक भाग राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांनी मतदार नोंदणी सक्रिय सहभागी व्हा तसेच आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत जागृत करावे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असल्याने या भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी व मतदानाच्या टक्केवारी सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करावेत असे, आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सोलापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने 18 ते 19 वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. विद्यापीठ सर्व महाविद्यालय व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात येऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य संतोष कोटी, यशपाल खेडकर, राजेश वडजे, एस.बी. क्षिरसागर, डॉ. उपाध्यय यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती सादर केली.

जिल्ह्यात मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी, संपर्क अधिकारी व प्राचार्य यांना प्रातिनिधिक स्वरूपात श्री. देशपांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *