मुंबई, दि. ११ : मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत पुणे विभागीय निपुणता केंद्रांतर्गत मैदानी (ॲथलेटिक्स), आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, रायफल शूटींग, रोईग, कुस्ती व टेबल टेनिस या खेळाच्या प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्या करिता पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे नं.१९१, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे विद्यालयासमोर, येरवडा पुणे ४११००६ येथे प्रत्यक्ष अथवा deputypune@gmail.com या ई-मेल वर मेल १७ मार्च २०२६ पर्यंत करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा, पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असून या योजने अंतर्गत पुणे विभागास मैदानी (ॲथलेटिक्स), आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, रायफल शूटींग, रोईग, कुस्ती व टेबल टेनिस या आठ खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे.
मिशन लक्ष्यवेध या उपक्रमाची अंमलबजावणी झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी दिसून येईल त्याकरिता विभागीय निपुणता केंद्रांतर्गत खेळाडूंची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी खालील निकषानुसार पात्र खेळाडूंनी अर्ज करावेत.
निकष खालीलप्रमाणे :
वयोमर्यादा : २५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी)
आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत दोन वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन छायाचित्र, शाळा/महाविद्यालय बोनाफाईडचे प्रमाणपत्र, पालकांचे संमती पत्र इत्यादी.
अधिवास : महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असणे आवश्यक (अधिवास प्रमाणपत्र)
क्रीडा कामगिरी : राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संबंधित खेळामध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू (एसजीएफआय, एएफआय, खेलो इंडिया मध्ये सहभागी फक्त) व गत दोन वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व फिटनेसचाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक.
वैद्यकीय तपासणी : शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.
या विभागीय निपुणता केंद्रात खेळाडूंची कौशल्य चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार असून, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांकडून निपुणता केंद्रात प्रवेश झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच निवासी खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था, पूरक आहार, क्रीडा व प्रशिक्षण साहित्य तसेच खेळाडूंचे देशांतर्गत/परदेशी प्रशिक्षण व देशांतर्गत/विदेशातील स्पर्धा सहभाग खर्च, खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या, किरकोळ वैद्यकीय खर्च हा विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्या मार्फत करण्यात येईल. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे या निपुणता केंद्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपसंचालक युवराज नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
गजानन पाटील/स.सं