दिव्यांगांसाठीच्या कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 23 : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वित्त विकास महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत कर्जसुविधा वेळेत पोहोचवाव्यात. प्रक्रियेत सुलभता आणावी तसेच जिल्हास्तरावर समन्वय वाढवावा. दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्ज योजनांचे महत्त्व असून स्वावलंबनाला चालना देण्यासाठी विभागाने अधिक परिणामकारक उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत विविध प्रलंबित प्रस्ताव, कर्ज वितरणाची सद्यस्थिती आणि आगामी कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अपंग महामंडळाचे नाव बदलून ‘महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ’ असे करण्यास मान्यता देण्यात आली.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *