विधानपरिषद लक्षवेधी

भंडारा जिल्हा परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा पदभार काढून पुनःचौकशीचे आदेश – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नागपूर, दि. १४ : भंडारा जिल्हा परिषदेत प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा पदभार काढून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत कायमस्वरूपी शिक्षण अधिकारी नियुक्त करण्याची निश्चित व्यवस्था केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उत्तर देताना बोलत होते.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, प्रशासनिक पातळीवर तातडीने निर्णय घेतले असून, पुनःचौकशीच्या आधारे दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित भंडारा जिल्हा परिषद येथील वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) यांचा ही पदभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांच्या चौकशीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी झाली, याची सविस्तर माहिती घेतली जाईल आणि नव्याने करण्यात येणाऱ्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतीने उपाययोजनाफेब्रुवारी २०२६ पर्यंत कामे पूर्ण होणार – राज्यमंत्री योगेश कदम

नागपूर, दि. १४ : ठाणे शहरातील ४२ मीटर रस्त्यावर एकाच वेळी सुरू असलेली नळपाणी योजना, मेट्रो व फ्लायओव्हरची कामे आणि वाढती वाहतूक यामुळे निर्माण झालेल्या कोंडीवर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने उपाययोजना आखल्या असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अॅड. निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी विषयी लक्षवेधी सूचना मांडली. यावर राज्यमंत्री कदम हे उत्तर देताना बोलत होते.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, सर्विस रोडवरील नळपाणी योजनेची कामे फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर सर्विस रोड पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल. रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेले मेट्रोचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे.

सर्विस रोड मर्ज करून रस्त्याची रुंदी वाढवण्याचे काम सुरू असून, त्यातील सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसी व एमएमआरडीए मार्फत खाडीगाव बायपास आणि गायमुख – घाट सेक्शनचे काम हाती घेण्यात आले असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी  व्यक्त केला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

वडाळा विभागातील अतिक्रमणावर कडक कारवाईबांगलादेशी घुसखोरांविरोधात संयुक्त ऑपरेशन –राज्यमंत्री योगेश कदम

नागपूर, दि. १४ : वडाळा विभागातील अतिक्रमण, त्यामागील साखळी तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या वास्तव्यास आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना आखल्या असून, गुगल मॅपिंग व गृह विभागाच्या संयुक्त कारवाईद्वारे अतिक्रमण रोखले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तर देताना गृह राज्यमंत्री कदम बोलत होते

गृह राज्यमंत्री कदम म्हणाले की, २०१२ मध्ये स्थापन झालेल्या कांदळवन विभागांतर्गत मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असून, सध्या या विभागात १८४ जवान कार्यरत आहेत. मात्र, आतापर्यंत अतिक्रमणाच्या मुद्द्यावर गृह विभाग व संबंधित विभागाची संयुक्त कारवाई झालेली नव्हती.

अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणातून उभ्या राहिलेल्या वस्त्यांची विक्री बेकायदेशीररीत्या भारतात आलेल्या व्यक्तींना करण्यात आल्याचे गंभीर प्रकार लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संपूर्ण कांदळवन विभागाचे गुगल मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील सहा ते आठ महिन्यांत २०१२ पूर्वीपासून सुरू असलेल्या अतिक्रमणांची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.

१५ व १६ डिसेंबर रोजी कांदळवन वडाळा परिसरात गृह  विभागाच्या संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. संशयित वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जाईल आणि किंवा बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे व पालघर या संपूर्ण कांदळवन वडाळा कार्यक्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी अशीच कारवाई करण्यात येणार असून, २०१२ नंतर नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा शासनाचा निर्धार त्यांनी यावेळी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *