मुंबई उपनगरातील मागाठाणे येथील झोपड्या तोडकाम प्रकरणाची ६० दिवसात सखोल चौकशी – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १० : मुंबई उपनगरातील मागाठाणे परिसरातील झोपड्यांच्या तोडकाम प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने न्यायालयीन आदेशानुसारच कार्यवाही केली आहे. याबाबत अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून ६० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सदस्य प्रकाश सुर्वे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, संबंधित जमीन 2020 मध्ये शैलाजी इन्फ्रास्ट्रक्चरकडे हस्तांतरित झाली. तोडकामावेळी 1995 पूर्वीच्या झोपड्यांना लागू होणारा संरक्षणाचा नियम लागू होतो का, याची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात येतील. नियम लागू झाल्यास झोपडीधारकांना दिलासा देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तोडकामादरम्यान बाऊन्सर लावल्याच्या आरोपांची चौकशी समितीमार्फत करण्यात येईल. तोपर्यंत कोणतीही निवासी झोपडी पाडली जाणार नाही.
यावेळी चर्चेत सदस्य भास्कर जाधव आणि मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
पुण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री बैठक घेणार – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि १० : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वारगेट, शनिवारवाडा येथे तीन मार्गिकेचे दोन भुयारी मार्ग तयार करण्याचे काम पुणे महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणी करावे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णायक बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात एक लक्षवेधी सुचनेद्वारे विचारणा केली असता मंत्री डॉ.सामंत यांनी उत्तर दिले.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, ८ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यशदा येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिकेला डीपीआर आणि मास्टर प्लॅन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र काही कालानंतर पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून, आमच्याकडे आवश्यक यंत्रणा नसल्याने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, अशी विनंती केली. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः पुढील १५ दिवसांत बैठक घेतील असे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ