कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : “राज्य आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रातील विकास तसेच पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे. कॅनडा आणि भारत दोन्ही देशातील विविध क्षेत्रात दीर्घकाळ असलेले मैत्रीपूर्ण धोरण अधिक दृढ होत आहेत. या कालखंडात कॅनडातील उद्योजक, व्यापार व गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी या विकासातील भागीदारी आणि सहकार्याच्या नव्या उंची गाठतील”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तंत्रज्ञान, शिक्षण, वित्त, व्यापार, गुंतवणूक, उद्योग यासह विविध बाबींवर चर्चा झाली. विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या संधींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळात कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त क्रिस कोटर, इंडो- पॅसिफिक ग्लोबल अफेअर्सचे उपमंत्री ई पी पी वेल्डन, चीफ ऑफ स्टाफ जेफ डेव्हिड यासह वरिष्ठ अधिकारी होते. तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, गुंतवणूक व धोरणविषयक मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग सचिव पी.अनब्ळगन, परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. राजेश गावडे, डॉ. अर्जुन देवरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई ही देशाची आर्थिक, औद्योगिक, करमणूक, स्टार्टअप क्षेत्रातील राजधानी आहे. भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होताना यामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार आहे. राज्याचे उद्योगस्नेही धोरण, तंत्रज्ञान , पायाभूत व ऊर्जा क्षेत्रातील विकासामुळे निर्यात आणि थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र प्राधान्याचे ठिकाण ठरले आहे”.

कॅनडा आणि भारतामध्ये सहकार्याचे नवीन बंध निर्माण होत असताना महाराष्ट्रातील व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, ऊर्जा , उद्योग , डेटा टेक्नॉलॉजी क्षेत्रात अभूतपूर्व संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भारताची आर्थिक प्रगती विलक्षण असून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासात कॅनडाने भारताचे भागीदार व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबई एज्यू- सिटीच्या माध्यमातून विविध देशातील विद्यापीठांचे येथे आगमन झाले असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅम्पस सुरू होत आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आंतरराष्ट्रीय शिक्षणाची उपलब्धता झाली आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, पायाभूत सुविधांची उपलब्धता अशा अनेक बाबींमुळे परिपूर्ण इकोसिस्टीम विकसित होत आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

विविध क्षेत्रातील भागीदारीसाठी सहकार्याच्या नव्या शक्यता – कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती अनिता आनंद

ही राजनैतिक भेट विकासासाठी नव्या ऊर्जेचे निदर्शक असल्याचे सांगून कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती अनिता आनंद यांनी एसएमआर टेक्नॉलॉजी क्षेत्र हे कॅनडाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून विविध क्षेत्रातील भागीदारीसाठी दोन्ही देशांतील सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही नमूद केले. महाराष्ट्राचे डेटा , तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.

दोन्ही देश एकत्र येऊन आधुनिक आणि भविष्याभिमुख भागीदारी निर्माण करत आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. कॅनडा-भारताने सर्वसमावेशक विकासासाठी वाटचाल करणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. याद्वारे रोजगारनिर्मिती, उच्च शिक्षणातील उत्तम संधी, दोन्ही देशांतील जनतेचे जीवनमान समृद्ध करणे ही उद्दिष्टे गाठता येतील. करणारे ठरणार आहे. परस्पर सहकार्याचा भाव हे संबंध अधिक दृढ करत असल्याचेही श्रीमती अनिता आनंद यांनी नमूद केले.

००००

किरण वाघ/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *