डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १: डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी संबंधित उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांचे तत्काळ निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
सदस्य विनोद निकोले यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री पाटील म्हणाले, दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी जबाबदार ठरलेल्या हरिश बोरवेल्स या कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
क्षयरोग प्रसार रोखण्यासाठी बी-पाल्म उपचारांसह विशेष मोहीम – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. १: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला असून, त्यानुसार राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची चाचणी करून, निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराखाली आणण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच क्षयरोगविरोधी औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांसाठी राज्यात नव्याने बी-पाल्म (BPaLM) उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.
सन २०२५ मध्ये २ लाख ३० हजार क्षयरुग्ण नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जानेवारी ते मे या कालावधीत राज्यात १७ लाख ३० हजार ८०८ क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामधून ९५ हजार ४३६ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले असून, त्यांची केंद्र सरकारच्या ‘निक्षय’ प्रणालीवर नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होऊ नये, म्हणून त्यांना तत्काळ उपचाराखाली आणण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या निक्षय पोषण योजनेअंतर्गत उपचारादरम्यान योग्य पोषण मिळावे, यासाठी रुग्णांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना’ अंतर्गत प्रत्येक क्षयरुग्णासाठी ‘निक्षय मित्र’ नेमले जात असून, उपचारादरम्यान किमान सहा महिन्यांसाठी ‘फूड बास्केट’ पुरविण्याची कार्यवाही सुरू आहे. क्षयरोग दूर करण्यासाठी ही मोहीम लोकचळवळ व्हावी, यासाठी सर्वसामान्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सभागृहात केले.
या लक्षवेधी सूचनेत सदस्य बाबासाहेब देशमुख, समीर कुणावर, मनीषा चौधरी आणि विक्रम पाचपुते यांनीही सहभाग घेतला होता.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/