राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात

नवी दिल्ली, दि. ०१ : महाराष्ट्र राज्याचा 66 व्या स्थापना दिन राजधानी दिल्लीत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत व राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ गाऊन ध्वजवंदन केले. या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरजीत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनातील निवासी अभ्यागत, दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम

दिल्ली उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रांत कार्यरत मराठी भाषिक मान्यवरांशी संवाद साधून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन या ठिकाणी करतील. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा जागर करणारा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघ, देवगड, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 मे दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने ‘महाराष्ट्राचा सुगंधी राजा’ हापूस आंब्याची खरेदी करण्याचीही सुवर्णसंधी दिल्लीकरांना उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत मराठी आणि इतर भाषिक दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वैभव सर्वांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

अमरज्योत कौर अरोरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *