मृत दिपाली ह्या आदिवासी (पावरा) समुदायाच्या
अनुसूचित जमातीच्या कुठल्याही महिलेवर अत्याचार सहन केला जाणार नाही
केवळ आरोपीला अवैध व्यवसायासाठी विरोध केला म्हणून झाली हत्या
नंदुरबार, दि. १६ (जिमाका): मलोनी येथे झालेल्या हाणामारीत मृत झालेल्या दिपाली सागर चित्ते या महिलेच्या वारसांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल. तसेच तिच्या वारसांच्या शिक्षणासह पालन पोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके दिले.
मंत्री डॉ. उईके आज शहादा तालुक्यातील मलोनी/लोणखेडा येथे पंधरा दिवसांपूर्वी हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी कुटुंबियांसोबत सहवेदना प्रकट करताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., नंदुरबारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री डॉ. उईके म्हणाले, चित्ते यांच्या हत्येतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच, पीडित कुटुंबाला आदिवासी विकास विभागातून सर्वतोपरी मदत केली जाईल. येथील घटनेप्रमाणे अन्य घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नयेत यासाठी दक्षता घेतली जाईल.भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही मंत्री डॉ. उईके म्हणाले.
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील सहा महिन्यांत विशेष प्रयत्न केले जातील, असे मंत्री उईके यांनी सांगितले. आमदार व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळा दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला जाईल, ज्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतील.
अवैध व्यवसायासासाठी विरोध केल्यानेच हत्या
मृतक दीपाली चित्ते ह्या अनुसूचित जमातीच्या रणरागिणी होत्या. तिने आरोपीच्या अवैध व्यवसायांना विरोध केल्यामुळे त्या वैमनस्यातून दिपाली चित्ते यांची हत्या करण्यात आली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी यावेळी सांगितले.
०००
The post दीपाली चित्ते यांच्या वारसांना शासन सर्वोतोपरी मदत करणार – मंत्री डॉ. अशोक उईके first appeared on महासंवाद.