‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 16 : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक  विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन झाले.

 

कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाऊंडेशनचे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर यासह, स्ट्राइड व्हेंचर्स आणि स्ट्राइडवनचे संस्थापक इशप्रीत सिंग गांधी, आयआयटीचे माजी विद्यार्थी कल्याण चक्रवर्ती, गो इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता, महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील एक हजार स्टार्टअप्स या कार्यक्रमात उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप्स सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप्स होते, आज देशात एक लाख 57 हजार स्टार्टअप्स झाले आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप्स क्रांतीत  सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात 26 हजार स्टार्टअप्स आहेत. देशात सर्वात जास्त महिला संचालक असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.  स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे.

उद्योजक, दूरदर्शी गुंतवणूकदार, धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. ‘इज ऑफ डूईंग’ बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिला आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.  भांडवली सहभागाच्या दृष्टीने मुंबई आघाडीवर असून, पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र  आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत.  नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअप्सला बळकटीकरण देणाऱ्या संस्था  आहेत. ग्रामीण भागातील नवकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगात सहभाग वाढवणार असून,   उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. शासकीय आणि खासगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअप्सना बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे रोजगार निर्माण करणारे घटक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘एआय’ स्टार्टअप्सचे सक्षमीकरण करून उत्कृष्टतेचे केंद्र बनतील. एआय हे तंत्रज्ञानातील भविष्य असून स्टार्टअप्ससाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे. यामुळे केवळ उद्योगाच्या संधी नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. राज्याला स्टार्टअप्समध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्य शासनासोबत काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी : मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती दिली. राज्यातील स्टार्टअप्सला जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रयत्नशील आहेत. जगात देशाला नंबर एक बनविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व स्टार्टअप्स देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप्स : फाल्गुनी नायर

‘नायका’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या की, महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगाच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याने महिलांचे सक्षमीकरण होत आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप्स कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांनी नक्की लाभ घ्यावा, असेही सांगितले.

यावेळी डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स आयटीआय गोवंडीचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप्स विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक, व्यवस्थापक अमित कोठावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन अवाना दुबाश, राखी तांबट यांनी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

The post ‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *