वस्त्रोद्योग विभागात रोजगार निर्मितीला चालना देणार – मंत्री संजय सावकारे

मुंबई, दि.24 : वस्त्रोद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. वस्त्रोद्योग विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना देऊन राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये हा विभाग मोलाचा वाटा उचलेल, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. सावकारे यांनी आज मंत्रालयात विभागाची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. वस्त्रोद्योग विभागातील विविध योजनांना गती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केली.

विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती व माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

The post वस्त्रोद्योग विभागात रोजगार निर्मितीला चालना देणार – मंत्री संजय सावकारे first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *