अमरावती लोकसभा मतदारसंघात १,१६७ मतदार गृहमतदानाचा हक्क बजावरणार

अमरावती, दि. १० (जिमाका): सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातील 1 हजार 167 नागरिक गृहमतदान करणार आहेत. या मतदारांकडून मतदानाची गोपनीयता पाळत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी प्रशिक्षण कार्यशाळेत आज केले.

85 वर्षांवरील तसेच दिव्यांग मतदारांना गृह मतदान सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मुख्य निवडणूक निरीक्षक सी. जी. रजनीकांथन यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, विभागीय क्रीडा विभागाचे उपसंचालक विजय संतान, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा टपाल मतपत्रिका नोडल अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, निवडणूक आयोगाने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाचा फायदा अमरावती लोकसभा मतदार  मतदारसंघातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना होणार आहे. ही सुलभ प्रक्रिया असली तरी या मतदानाची गुप्तता बाळगणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पथकांनी प्राप्त झालेल्या अर्जानुसार प्रत्येक वयोवृद्ध व दिव्यांगाचे मतदान करुन घ्यावे.

07-अमरावती लोकसभा मतदार संघातील एकूण 1 हजार 167 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली असून यात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 973 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 194 आहे. या मतदारांनी गृहमतदानाकरिता आवश्यक असलेला फॉर्म 12-डी प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जानुसार गृहमतदानाची प्रक्रिया शुक्रवार, दि. 12 ते 14 एप्रिल दरम्यान होणार आहे. वयोवृद्ध व दिव्यांगाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधासभानिहाय पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस व व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *