प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ५ सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

वाशिम, दि. 5 :  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.

कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून ते टप्प्या टप्प्याने सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यापैकी धोंदलगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), बामणी बुद्रक (जिल्हा नांदेड), हरोली (जिल्हा कोल्हापूर), जलालाबाद (जिल्हा अकोला), पलशी बुद्रुक (जिल्हा बुलढाणा) या एकूण १९ मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण झाले. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना प्रधानमंत्र्ंयाच्या हस्ते २०.५५ कोटी रुपये विकासनिधी ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला.

शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी सध्या दिवसा व रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी त्यांची मागणी आहे. पीएम कुसुम अर्थात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. या योजनेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी दरवर्षी सव्वा लाख रुपये प्रती हेक्टर दराने जमीन भाड्याने देण्याचीही सुविधा शेतकऱ्यांसाठी आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *