पारदर्शी व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

सातारा दि.5:   भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे ततोतंत पालन  करुन लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा टक्का वाढवावा. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

विधानसभा निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व प्रांतअधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणूक विषयक तयारीचा विधानसभानिहाय आढावा घेवून प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले,  सातारा जिल्ह्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये गत निवडणूकीतील मतदानाचा टक्का हा राज्याच्या निवडणूक मतदानाच्या टक्क्यापेक्षा कमी आहे.याची कारणे शोधून त्याठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी,यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांची मदत घेण्यात यावी.मतदान केंद्रांवर सर्व पायाभूत सुविधा सुव्यवस्थित राहतील याची खात्री करावी.प्रत्येक पात्र मतदाराला त्याचे मतदान ओळखपत्र मिळेल याबाबत दक्षता घ्यावी.  मतदारयादीतून नावांची वगळणी होत असताना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.  जास्त गर्दी होणा-या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी बैठक व्यवस्था करावी, यासाठी टोकन पध्दती अंमलात आणावी.  मतदान कक्षामध्ये एकावेळी चार व्यक्तींना प्रवेश द्यावा, व्हीव्हीपॅट व पॉवर पॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील हे कटाक्षाने पहावे.

महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून निवडणूकीमध्ये तपासणी पथकांकडून जप्त करण्यात येणाऱ्या मुद्देमालांची संख्या अत्यंत कमी असते असे सांगून एस चोक्कलिंगम म्हणाले, या निवडणूकीमध्ये एफएसटी, एसएसटी पथकांनी अत्यंत दक्ष राहून कारवाई करावी.  कोणत्याही पध्दतीने पैश्याचे अथवा अन्य बाबींचे प्रलोभन देवून मतदान प्रक्रीयेवर प्रभाव टाकला जाणार नाही याबाबत सर्वोतपरी काळजी घ्यावी, लोकांना पारदर्शी व भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

 कोणत्याही स्थितीत निवडणूक यंत्रसामुग्रीसाठी ताटकळत उभे रहावे लागू नये यासाठी सेक्टर अधिकारी नियुक्त करुन त्यांच्यामार्फत पोलिंग पार्टींना यंत्रसामुग्री देण्यात यावी व त्याच पध्दतीने जमाही करुन घेण्यात यावी.  निवडणूकीसाठी नियुक्त मनुष्यबळांना आवश्यक  प्रशिक्षण देण्यात यावे.

निवडणूक आयोगाला कळविण्यात येणारी विविध प्रकारची माहिती अत्यंत बिनचूक असावी,  तपासणी नाके कार्यरत करावेत.लक्झरी बसेस, खाजगी वाहने यांच्याबरोबरच हेलिकॉप्टर यांचीही काटेकोरपणे तपासणी व्हावी.  प्रचार कालावधीमध्ये सामाजिक सौदार्ह बिघडवणारी वक्तव्ये झाल्यास त्वरीत कारवाई करण्यात यावी.

 बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, बोगस मतदार नोंदणीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांचे विहीत मुदतीत निराकरण करण्यात येईल असे सांगून जिल्ह्यात करण्यात आलेल्या निवडणूक विषयक तयारीचा आढावा सादर केला.  पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनूषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभाग, आचारसंहिता, मनुष्यबळ, बॅलेटपेपर, दळणवळण, इव्हीएम, सामग्री, माध्यमप्रमाणीकरण व संनियंत्रण आदी सर्व विषयांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *