राष्ट्रीय कृषी विकास योजना : प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना

राज्याकडे उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी व सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून  योजनेंतर्गत केंद्र व राज्य हिश्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 आहे.  ही योजना राज्यातील  ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते. सूक्ष्म सिंचन योजनेत राज्य देशात अग्रेसर असून ३१.९६ लाख हेक्टर  क्षेत्रास सूक्ष्म सिंचन योजनेतून लाभ देण्यात आला आहे.   तसेच या योजनेकरिता सन २०२४-२५ मधील प्राप्त पहिल्या हप्त्याचा रु. ११३.९० कोटी निधी वितरित केला आहे.

या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर इतर शेतक-यांना (५  हे.  क्षेत्राच्या मर्यादेत) ४५टक्के अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ” प्रति थेंब अधिक पीक ” या योजनेंतर्गत अनुज्ञेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमधून व अटल भूजल योजनेमधून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के पूरक अनुदानासह एकूण ८० टक्के आणि इतर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ३० टक्के पूरक अनुदानासह एकूण ७५ टक्के अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत “प्रति थेंब अधिक पीक” या योजनेंतर्गत सन २०२३-२४ मध्ये 1 लाख 16 हजार 700 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून त्याद्वारे ९३ हजार ३०७ हेक्टर क्षेत्र  सिंचनाखाली आणण्यात आले आहे.

सन २०२४-२५ या वर्षात राष्ट्रीय कृषि विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक योजनेकरिता रु. ६६७.५० कोटी रकमेचा कार्यक्रम मंजूर केला  आहे.राष्ट्रीय कृषि विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक योजनेकरिता सन 2024-25 मधील प्राप्त पहिल्या हप्त्याचा सर्व साधारण प्रवर्ग ८९.५० कोटी रुपये, अनुसूचित जमाती प्रवर्गाचा १०.४० कोटी रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गाचा १४ कोटी रुपये असा एकूण ११३.९० कोटी रुपये निधी जिल्हा स्तरावर वितरीत केला आहे.

 

दत्तात्रय कोकरे

विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-32.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *