महिला स्वावलंबी होण्यासाठी शासनाचे पाठबळ, मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. ३० : पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन महिलांकरिता रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या अनुषंगाने मुंबई शहरातील महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करुन स्वावलंबी होता यावे यासाठी आवश्यक ते पाठबळ दिले जात असून महिलांसाठी उद्योग केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना याबरोबरच महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरिता येथील षण्मुखानंद सभागृहात मुंबई शहर जिल्हा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांना विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबईत महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी विविध उपक्रम सुरू केले जात आहेत. कोळीवाड्यांमध्ये फूड कोर्टच्या माध्यमातून कोळी भगिनींच्या हाताला काम मिळत आहे. रात्री रिकाम्या असणाऱ्या रस्त्यांवर त्या त्या भागामध्ये प्रचलित पदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत विविध ठिकाणी महिला दिवाळीचा फराळ बनवून विक्री करू शकतील याचे देखील नियोजन करण्यात येत आहे. महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे आणि त्यांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण अंतर्गत शासन स्तरांवर विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर महिलांचे आरोग्य व आहार, लखपती दीदी आणि आर्थिक साक्षरता याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यामध्ये मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरात आतापर्यंत ४ लाख २४ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून लाभ हस्तांतरणासाठी ३ लाख ९६ हजार ४९१ अर्ज शासनास पाठविण्यात आले आहेत. त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना करून देण्यामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या संबंधित अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार कॅ. तमिल सेलवन, कालिदास कोळंबकर, श्रीमती यामिनी जाधव, राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह, क्षेत्रनिहाय समिती अध्यक्ष अतुल शाह, अजय पाटील, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी. सुपेकर, महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) प्राची जांभेकर यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *