राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनी नाशिक जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 25 सप्टेंबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सन 2021 मध्ये केंद्र सरकारने घेतला होता. त्याअंतर्गत मुलींसाठी भारतात पहिली शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिक येथे सुरू झाली. या संस्थेतून जुई देशपांडे, संस्कृती तळमळे, हंसिका टिल्लू या तीन विद्यार्थिंनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे परिश्रम व संपादित केलेले यश  जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रो.ह.यो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले.

येथील एनडीए सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात उत्तीर्ण विद्यार्थिंनींच्या सत्कार समारंभात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे, एनडीए सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक साईदा फिरासत, कर्नल उदय पोळ, विश्वस्त राहुल रामचंद्रन यांच्यासह शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री.भुसे म्हणाले की, शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, एनडीएच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नाशिक केंद्रातून 28 मुलींमधून 3 मुली पात्र ठरल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.गेल्या दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून त्यांनी हे यश मिळविले आहे. उर्वरित 25 विद्यार्थिंनींनी  अथक परिश्रम करीत यश मिळवावे. परीक्षेत यशस्वी झालेल्या  विद्यार्थिंनींनीही इतर मुलींना आपल्यासोबत यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. अभ्यास व सराव यातून विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मेहनत करण्याची तयारी ठेवावी. प्रशासनाकडून शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेस आवश्यक सुविधा देण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या की, आज तुमच्याशी झालेला संवाद व त्यातुन तुम्ही दिलेली समर्पक उत्तरे यातूनच तुम्ही यशस्वी झाला आहात. एनडीए साठी आज तीन विद्यार्थिंनी यशस्वी झाल्या आहेत. त्यांची परंपरा वाढविण्याचा ध्यास मनी बाळगावा, आपली ध्येये निश्चित करा. अशा शब्दात कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.

यावेळी संचालक साईदा फिरासत यांनीही मनोगत व्यक्त केले. जुई देशपांडे, संस्कृती तळमळे, हंसिका टिल्लू या विद्यार्थिनींचा पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *