बांधकाम कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर, दि. २१ : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे. बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील 38 लाखांवरील कामगारांची नोंदणी करून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

येथील गोपालनगर परिसरातील नवनिर्माण गृह संकुलाच्या मैदानावर आयोजित ‘बांधकाम कामगार मेळाव्यात’ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, माजी महापौर संदीप जोशी, नगरसेविका सोनाली कडू आदी यावेळी मंचावर  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्या मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे. या कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहे. बेघर कामगारांना ‘अटल आवास योजना’ आणि  ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून 4 लाखांची आर्थिक मदत देऊन हक्काची घरे देण्यात आली. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यात येत आहे.बांधकाम कामगारांना आज सुरक्षाकवच कार्ड देण्यात आले असून याद्वारे कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य,शिक्षण,घरकुल आदी 12 सेवा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यशासनाने जनसामान्यांसाठी  विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला  1500 रुपयांची मदत देण्यात येते. ‘लेक लाडकी योजने’च्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षा पर्यंत टप्प्या टप्प्याने 1 लाखा पर्यंतची मदत देण्यात येत आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपतीदीदी करण्याचा निर्धार राज्य शासनाने घेतला आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजने प्रमाणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली असून या योजनेचा राज्यातील जास्तीत –जास्त युवकांनी  लाभ घ्यावा, असेही  श्री. फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *