महाराष्ट्र देशाच्या तर एमएमआर महाराष्ट्राच्या प्रगतीचे इंजिन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि. २१ (जिमाका): देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे, तर आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित ‘मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत’ ‘ठाणे विकास परिषद-2024’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ‘मित्रा’ चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूराणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपण मुंबई महानगर प्रदेशात पाच सेक्टर्समध्ये जर धोरणात्मक काम केले तर आपली अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता या मुंबई महानगर प्रदेशात आहे. यामुळे सर्वांना उद्योग, सर्वांना रोजगार, सर्वांना घरे, हरित ठाणे अशा सर्व गोष्टी साध्य करु शकतो. ठाण्यामध्ये काही गोष्टी सुरु होतात, मग नंतर त्या इतर सर्व ठिकाणी सुरु होतात, असा हा ठाण्याचा इतिहास आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होईल, इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे.

ते म्हणाले, शेतीनंतर रिअल इस्टेट जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्र आता जीडीपी, परदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात अशा विविध क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी 52 टक्के ही एकट्या महाराष्ट्राची आहे. अटल सेतूमुळे आपण आता मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 20 मिनिटात करू शकतो. या प्रकल्पाबाबत आधी फ्लेमिंगो पक्षी नाहीसे होतील अशी टीका करण्यात आली. मात्र, पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थांनी प्रत्यक्षात फ्लेमिंगोंची संख्या दुप्पट झाल्याचा अहवाल दिला आहे. अटल सेतू हा मार्ग एक गेम चेंजर प्रकल्प ठरला आहे. समृद्धी महामार्गामुळे 8 तासात आपल्याला नागपूरला पोहोचता येते. लवकरच ठाणे ते बोरिवली प्रवास आपण 20 मिनिटात करू शकणार आहोत. ईस्टर्न फ्री वेचा विस्तार करण्यात येत आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरु होत आहे. असे विविध प्रकल्प साकारताना, विकासकामे करताना जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम लवकर पूर्ण होणार आहे. पालघरला  तिसरे विमानतळ तयार करीत आहोत. आपल्याकडे उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी असल्यामुळे उद्योग आपल्या राज्यात येत आहेत. दाओसला जाऊन 1 लाख 37 कोटींच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यातील बहुतांश उद्योगांचे कामही सुरु झाले आहे. 3 लाख 50 हजार कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. नुकताच इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर चीप बनविण्याचाही प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. लवकरच इलेक्ट्रॉनिक्स  सेमिकंडक्टर चीप बनविण्याच्या प्रकल्पासाठी 84 हजार कोटींचा करार होतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पॉवर, स्टील, औषध निर्माण अशा विविध क्षेत्रातील उद्योग येत आहेत. मी सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की, उद्योग क्षेत्रातील कोणतीही तक्रार येता कामा नये. माझ्याकडे तक्रार आलीच तर मी त्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करतो. राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले तर राज्याची प्रगतीही जास्तीत जास्त होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे.

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की, ज्याने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. काही देश हे पर्यटन व्यवसायावर चालतात. आपल्या राज्याला तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. आपण विकासाची वर्गवारी केली आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा विकास जलद होणार आहे. हे शासन विकासाला चालना देणारे आहे. ठाण्यामधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारतींमधील सर्वांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हक्काचे घर देण्याचे काम सुरु केले आहे. सिडको आणि ठाणे महानगरपालिका हे काम करीत आहे. पहिल्या टप्प्यातील 17 हजार घरे बांधण्याचे  काम वेगाने सुरु आहे, असेही ते म्हणाले.

पर्यावरण रक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने 1 लाख 25 हजार झाडे लावली आहेत. 21 लाख हेक्टरमध्ये बांबू  लागवड करीत आहोत. बांबू हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो. त्यामुळे बांबू लागवड पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आहे. आपल्या सर्वांना पर्यावरणाचे संतुलन राखावे लागेल, ही काळाची गरज आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर नीती आयोगाच्या अहवालातील सूचनांप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. याबाबतीत ‘मित्रा’ संस्थेने पुढाकार घेवून त्याप्रमाणे दिशा देण्याचे  काम केले आहे. ठाणे जिल्ह्याची 48 बिलियन डॉलर अर्थव्यवस्था आहे, सन 2030 पर्यंत ती 150 बिलियन डॉलर होणे हे आपले उद्दिष्ट आहे. ठाण्याचा जीडीपी 7.5 टक्के आहे, हा जीडीपी 20 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठाण्यामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातूनच खड्डेमुक्त रस्ते, सेंट्रल पार्क, ब्लू सी, एसटीपी प्लँट, प्रदूषणमुक्त पाणी यासारखे विविध उपक्रम सुरु आहेत, असे सांगून ते म्हणाले की, विकास आणि कल्याणकारी योजना राबविणारे तसेच राज्याच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अहोरात्र काम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रशांत रोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील उद्योजक, विद्यार्थी, अधिकारी आणि सामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत‘ठाणे विकास परिषदेचे उद्घाटन संपन्न

ठाणे दि.२१ (जिमाका): विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी,  ‘ठाणे विकास परिषद-2024’ चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या कार्यक्रमाचे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मंचावर ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, “मित्रा” चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करुन नियोजनबद्ध आराखडा केला जात आहे. याअनुषंगाने या विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ‘ठाणे strategic प्लॅन’ चे सादरीकरण केले. तद्नंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. “मित्रा” संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी  परिषदेच्या उद्देश व उद्दिष्टांची माहिती दिली.

या विकास परिषदेत सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर शासनाचे अधिकारी व संबंधित क्षेत्रातील मान्यवरांमध्ये चर्चासत्रेही पार पडली मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

०००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *