चौपदरी क्राँकीट रस्त्यांमुळे वाहतूक सुरळीत होऊन दळणवळण वाढणार – मंत्री छगन भुजबळ

पिंपळस ते येवला, लासलगाव-विंचुर-खेडलेझुंगे चौपदरी रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

नाशिक, दिनांक 14 सप्टेंबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा):  उपलब्ध निधीतून तयार होणाऱ्या चौपदरी क्राँकीट रस्त्यांमुळे वाहतुक सुरळीत होणार तसेच अपघांताचे प्रमाण कमी होवून दळवणवळणास चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. निफाड तालुक्यातील विंचूर चौफुली येथे आयोजित पिंपळस ते येवला, लासलगाव-विंचुर-खेडलेझुंगे चौपदरी रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास आमदार दिलीप बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, मुख्य अभियंता प्रशांत औटी,  उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार विशाल नाईकवाडी , गटविकास अधिकारी उमेश पाटील,  , सरपंच सचिन दरेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ यावेळी म्हणाले, पिंपळस ते येवला रस्त्यासाठी चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करून  ५६० कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठं कांद्याचे मार्केट आहे. लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक होते यासाठी १३४ कोटी रुपये लासलगाव विंचूर खेडलेझुंगे रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर यासह अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. रुई फाटा ते खेडलेझुंगे या  ६ कि.मी  रस्त्याचे  काम  CMGSY टप्पा ३ मधून होणार असून यासाठी  ८० कोटी निधीस लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. रुईफाटा ते धारणगाव हा २ किमी चा रस्ता सुद्धा आपण आगामी अर्थसंकल्पातून कॉंक्रीटचा करणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शिवसृष्टी प्रकल्पातून सकारत आहे. पाच एकर जागेत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून हा भव्यदिव्य प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे २६ सप्टेंबर २०२४ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. तर २२ सप्टेंबर रोजी या पुतळ्याचे आगमन होणार असून या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत होणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी केले.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अधिक १० कोटी रुपये मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच या परिसरातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच प्रमाणे धुळगावसह १६ गावे, राजापुरसह ४१ गावे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लासलगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी रूपये १३.५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लासलगाव शिवनदी व विंचूर लोनगंगा नदी स्वच्छता करण्यासाठी रूपये २७ कोटी  निधी मंजूर झाला आहे. लासलगाव बाह्य वळण रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून मार्च पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. लासलगाव येथून सिन्नर व शिर्डीकडे जाणारा बोकडदरा खेडलेझुंगे रस्त्याची रुंदी ५.५ मीटर वरुन ७ मीटर होणार असल्याने या रस्त्यावरील दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी केले.

या कामांचे झाले भूमिपूजन
• पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण (५६० कोटी)
• चांदवड हद्द – लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता रामा क्र ७ किमी १८९/४०० ते १९९/०००  आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण  (१३४ कोटी)

आशियाई विकास बँक प्रकल्पातील पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण या रस्त्याच्या कामासाठी ५६० कोटी तर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या अंतर्गत चांदवड हद्द – लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता रामा क्र ७ किमी १८९/४०० ते १९९/०००  आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण या रस्त्यासाठी १३४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर रामा ७ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून हा रस्ता विंचूर येथे रामा क्र. २ या चौपदरी रस्त्याला मिळतो. लासलगाव येथे आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या रस्त्यावर दळणवळण अधिक असल्यामुळे सातत्याने अपघात होतात. यासाठी चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉक्रिटीकरणासाठी  विशेष पाठपुराव्यातून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर हा ९.६०० किलोमीटर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी शासनाची मंजुरी प्राप्त होवून या  कामासाठी १३४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *