विजांच्या दुर्घटनेपासून बचावासाठी मोबाईल ॲप संबंधी जनजागृती करा – मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे

मोर्शी येथे मोबाईलव्दारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांच्या दारी’ कार्यशाळा संपन्न

 अमरावती, दि. 10 : विजांच्या दुर्घटनामुळे शेतकरी, शेतमजूर व पशुधनाचे मृत्यू टाळण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. विजांच्या दुर्घटनांपासून बचाव होण्यासाठी मेघदूत, दामिनी-लाईटनिंग, अलर्ट, मौसम व सचेत यासारख्या मोबाईल ॲपचा व अधिकृत संकेतस्थळांच्या वापराबाबत शेतकरी बांधवांना माहिती करुन द्यावी, अशा सूचना स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी मोर्शी येथील कार्यशाळेत दिल्या.

स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, मोर्शी येथील आर.आर.लाहोटी विज्ञान महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अमरावती विभागीय अभ्यासकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोबाईलव्दारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांच्या दारी’ या विषयाची कार्यशाळा मोर्शीच्या लाहोटी विज्ञान महाविद्यालयात रविवारी (ता.8 सप्टेंबर) संपन्न झाली. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ॲड. हेलोंडे बोलत होते.

लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन चौधरी, मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एफ.सी. रघुवंशी, केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूरचे हवामान शास्त्राचे विशेषज्ञ डॉ. सचिन वानखेडे आदी कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यशाळेत शेतकरी बांधव तसेच युवक-युवतींना विजांच्या दुर्घटनांपासून बचाव होण्यासाठी मेघदूत, दामिनी-लाईटनिंग, अलर्ट, मौसम व सचेत यासारख्या मोबाईल ॲपचा व अधिकृत संकेतस्थळांच्या वापराबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

स्व. वसंतराव नाईक शेती स्वालंतबन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण कार्यशाळांचे आयोजन याबाबत मिशनचे अध्यक्ष श्री. हेलोंडे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, विजांच्या दुर्घटनामुळे शेतकरी, शेतमजूर व पशुधनाचे मृत्यू टाळण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना मोबाईलच्या माध्यमातून विविध नैसर्गिक आपत्तीच्या सूचना, हवामान अंदाज व कृषी विषयक सल्ला यासह विजांच्या दुर्घटनांपासून बचावसाठीच्या उपाययोजना संदर्भात तात्काळ माहिती होणे आवश्यक आहे, असे ॲड. हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारच्या कार्यशाळांच्या नियमित आयोजनातून शेतकरी बांधवांना याबाबत अवगत करुन मार्गदर्शन करावे. हवामान अंदाज व नैसर्गिक आपत्तीची सूचना देणारे विविध मोबाईल ॲप विषयी शेतकऱ्यांना माहिती देवून ते त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करुन द्यावेत, अशा सूचना श्री. हेलोंडे यांनी कृषी विभागाला दिल्या.

हवामान आधारित कृषी सल्ला याबाबत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे विशेषज्ञ डॉ. वानखेडे यांनी शेतकरी बांधव व युवक, विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. हवामान अंदाज विषयातील शास्त्रीय संज्ञा समजावून सांगितल्या. विजांच्या दुर्घटनामुळे होणारे मृत्यू, विजांची राज्यनिहाय आकडेवारी, विजांचे प्रकार, विजांच्या दुर्घटनांमध्ये होणाऱ्या मृत्यूची कारणे व नुकसान तसेच यापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजना, मार्गदर्शक सूचनांच्या अवलंबसंबंधी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

मोबाईलच्या माध्यमातून विविध नैसर्गिक आपत्तीच्या सूचना, हवामान अंदाज व कृषी सल्ला तसेच विजांच्या दुर्घटनांपासून बचावासाठी विविध मोबाईल ॲप व विविध अधिकृत संकेतस्थळाबाबत डॉ. वानखेडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. मेघदूत, दामिनी-लाईटनिंग, अलर्ट, मौसम व सचेत यासारख्या मोबाईल ॲपचा वापर संबंधी त्यांनी माहिती देऊन ते डाऊनलोड करुन वापराबाबत प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित शेतकरी बांधव, महिला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये उपरोक्त ॲप डाऊनलोड करुन त्याच्या उपयोगाबाबत मार्गदर्शकांना आश्वस्त केले.

डॉ. रघुवंशी यांनी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविल्या जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. प्राचार्य डॉ. चौधरी यांनी आर.आर.लाहोटी विज्ञान महाविद्यालय व संस्थेच्या रोजगार निर्मिती व शैक्षणिक उपक्रमांबाबत यावेळी माहिती दिली.

यावेळी मोर्शी परिसरातील शेतकरी बांधव, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थींनी तसेच कृषी क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *