एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल
मुंबई, दि. 29 : राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार, जागतिक बँक, आशियाई डेव्हलपमेंट बँक आदी मार्फत निधी उभारणी केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी पाठबळ असून एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित पुढारी न्युज पहिला वर्धापन दिन निमित्त ‘महाराष्ट्राचा विकास व भविष्यातील महाराष्ट्राची वाटचाल’ या विषयावर प्रसन्न जोशी यांनी घेतलेल्या मुलाखत प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बोलताना महाराष्ट्राच्या विकासाचा पट उघडून दाखविला. विकास कामांमुळे गुजरात व कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. मेट्रो लाईन–3 प्रकल्प सप्टेंबर मध्ये जनतेसाठी खुला केला जाईल. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, रेल्वेचे पायाभूत सुविधा व वाहतूक प्रकल्प, बुलेट ट्रेन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता – कोस्टल रोड या प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठू शकतो असे नीती आयोगाने म्हटले आहे. या दृष्टीने लॉजिस्टिक्स पार्क, वाढवण, दिघी, औद्योगीक हाय-ग्रोथ इंडस्ट्रीयल हब, विकासीत करण्यात येत आहे. नागरी विकासाच्या व उत्पादन प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत विकासाला दिलेले प्राधान्य महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न तसेच युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत राज्य सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांतून व विकास कामातून 45 हजार कोटी रुपये खर्च केले असून मुलींना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय ,अभियांत्रिकी सारख्या अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी सवलत दिली आहे.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, यामुळे अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. रक्षाबंधनपूर्वी बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. भविष्यात ही रक्कम 3000 पर्यंत वाढविण्यात येईल. असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे पुढारी मीडिया हाऊस तर्फे पद्मश्री प्रतापराव जाधव यांनी ‘वेध महाराष्ट्राचा’हे कॉफी टेबल बुक व पुढारी न्युज च्या ‘गोल्डन बूम’ चे सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, समूह संपादक योगेश जाधव, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
00000