ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर दि.19 (जिमाका): पॅरिस येथील ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक व त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ घेण्यात येणार आहे, या समारंभात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणूक व सत्कार समारंभाबाबत नियोजन बैठक पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात येत आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून ते दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीनंतर दसरा चौकात सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मिरवणुकीदरम्यान स्वप्नीलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तर ढोल ताशा, हलगी व झांज पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या कोल्हापूरच्या सुपुत्राच्या कौतुक सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या या भव्य मिरवणूक व सत्कार समारंभात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *