चला.. साजरा करुया.. पर्यावरणपूरक गणेशोत्सव.. !

गणेशोत्सवाची लगबग आता लवकरच सुरु होईल आणि वातावरणात चैतन्य, उत्साह पसरेल.. शासन आणि संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरोगामी विचारांचा जिल्हा असणारा कोल्हापूर जिल्हा या उपक्रमात अग्रेसर आहे. आपण सर्वजणही शाडू अथवा मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जन, मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांवर भर, लोककला व शिवकालीन साहसी कलांच्या सादरीकरणातून या कलेला चालना, डॉल्बीचा मर्यादित आवाज ठेवून खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया आणि आपल्या आरोग्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करुया.. !

शाडू व मातीच्या गणेश मूर्तींवर भर

सध्या बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवल्या जातात. तसेच या मूर्तींना सजवण्यासाठी हानिकारक ठरणारे रंग वापरले जातात. या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले तरी त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत.  त्यामुळे जल, वायू प्रदुषणात भर पडते. म्हणूनच शाडू अथवा मातीच्या गणेश मूर्ती बसवण्यावर भर देणं गरजेचं आहे.

पारंपरिक वाद्यांचा वापर

विविध भागांतील लोकनृत्य, कलापथक व पारंपरिक वाद्यं ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. कोणत्याही मोठ्या सण समारंभात ढोल, ताशा, हलगी, झांज, लेझीम तसेच तलवारबाजी, दांडपट्टा, मर्दानी खेळ अशा शिवकालीन साहसी कला प्रकारांना चालना देणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सव व मिरवणुकीदरम्यानही लोकनृत्य व पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरणावर भर देणे आवश्यक आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाचे प्रयत्न

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देवून गौरवले जाते. मागील वर्षी राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाच्या मंडळाला 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार, तर तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवले होते. तर उर्वरित उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

जिल्ह्यात सन 2015 पासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सन 2015 ते 2023 या नऊ वर्षांत या उपक्रमाला येथील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. हा उपक्रम अत्यंत नियोजनद्ध पध्दतीने यशस्वी होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी अशा सार्वजनिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होवू नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नियोजन केले आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, पर्यावरण विभागाचे अधिकारी व तज्ज्ञांसमवेत जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनीही सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी चोख नियोजन केले आहे. या उपक्रमात अधिकाधिक कुटुंबे सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात येत आहे.

गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करताना धातू, संगमरवरी, इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणे तसेच घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजिकच्या कृत्रिम तलाव, कुंड अशा कृत्रिम विसर्जनस्थळी करण्याबाबत गावस्तरावर प्रबोधन, गावनिहाय मूर्ती संकलन व विसर्जन, फेर विसर्जनासाठी दिलेल्या मूर्ती मुर्तीकारांकडे परत देण्यासाठी गावस्तरावर यादी करणे, निर्माल्य संकलन, वाहतूक व्यवस्था व त्याचे सुयोग्य व्यवस्थापन याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे जिल्हा स्तरावरुन सनियंत्रण करण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मागील वर्षी जिल्ह्यात एकूण 1 हजार 122 जुन्या विहीरी, खणी निश्चित करण्यात आल्या होत्या. तर एकूण 977 काहिली, कृत्रिम तलाव, मोठी भांडी अशी पर्यायी व्यवस्था केली होती. तसेच मुर्ती परत घेण्यासाठी 300 मुर्तीकार होते. निर्माल्य संकलनासाठी 1 हजार 321 ट्रॉली व 188 घंटागाडी ठेवण्यात आल्या होत्या.

सन 2023 मध्ये 4 लाख 67 हजार गणेशमूर्ती संकलित करुन त्या जलस्त्रोतात विसर्जित न करता पर्यायी विसर्जन कुंड तयार करुन श्रद्धापूर्वक विसर्जित केल्या गेल्या. नदी प्रदुषण टाळण्यासाठी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी केले आहे.

फटाक्यांचा अतिरेक टाळूया

फटाक्यांमधील हानिकारक वायू आणि विषारी पदार्थ वातावरणात मिसळले गेल्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होवून आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासाठी सर्वच सार्वजनिक सण, समारंभांमध्ये फटाक्यांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे.

आवाजाची पातळी मर्यादित ठेवूया

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत सन 2023 मधील गणेशोत्सवादरम्यान कोल्हापूर शहरातील 22 ठिकाणच्या आवाजाची मोजमाप चाचणी केली होती. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वच ठिकाणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड) ने घालून दिलेल्या मानांकनापेक्षा जास्त मर्यादा ओलांडण्यात आल्याचे दिसून आले. शैक्षणिक परिसर, रुग्णालये, न्यायालयाच्या आसपासच्या शांतता क्षेत्रातही आवाजाची पातळी प्रमाणापेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे संशोधनातून आढळून आले.

रहिवासी क्षेत्रात रात्रीच्या वेळी 45 डेसिबलच्या आसपास आवाजाची पातळी असणे आवश्यक असते. मात्र अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील बहुतांशी भागात 76 ते 78 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. मिरवणूक मार्गावर रात्रीच्या वेळी 102 डेसिबल म्हणजे साधारण दुप्पटीच्या आसपास आवाजाची नोंद झाली असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या विभाग प्रमुख आसावरी जाधव यांनी दिली आहे. आरोग्याच्या हितासाठी सण, समारंभ, मिरवणुकांदरम्यान आवाजाची पातळी मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

पर्यावरण स्नेही कृतीची गरज

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात होणारे जलस्त्रोतांचे प्रदूषण आणि गाळाचे प्रमाण अधिक होऊन उद्भवणारा पुराचा धोका, फटाके आणि ध्वनीक्षेपकांनी मर्यादा ओलांडल्यामुळे झालेले हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण हे मानवाला विशेषत: वृद्ध, गर्भवती आणि लहान मुलांना आघात पोहचविणारे आहे. लोकांनी याबाबत सजगपणे बदल स्वीकारुन पर्यावरण स्नेही कृती केली पाहिजे. तरच पर्यावरण टिकून राहण्यास मदत होईल, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी केले आहे.

चांगल्या आरोग्यासाठी खबरदारी घेवूया

सर्वसाधारणपणे आपण 50 डेसिबलपर्यंतचा आवाज अर्ध्या ते एक तासापर्यंत सहन करु शकतो त्याहून अधिक आवाज अर्ध्या तासापेक्षा जास्त ऐकावा लागला तर डोके दुखणे, डोके जड येणे अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो. तर त्याहून जास्त पातळीचा आवाज तीन मिनिटांहून अधिक काळ सलग ऐकावा लागला तर कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. तसेच शरीराचे ब्लड सर्क्युलेशन गतीने होते. यामुळे उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) जडतो. त्याचबरोबर ब्लड प्रेशर मध्ये चढ-उतार होऊन हृदय, मेंदू व शरीराच्या कोणत्याही भागाला इजा पोहोचू शकते. 130 हुन अधिक डेसिबल आवाजामुळे कान, डोके सुन्न होणे, चक्कर येऊन शुद्ध हरपून जाणे मेंदूत रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) होऊ होवू शकतो. तसेच कानाचे पडदे फाटून कायमस्वरूपी बहिरत्व येऊ शकते. हृदयात धडधड, हार्ट फेल्युअर कायमचा हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.

सर्वसाधारणपणे 70 डेसिबल होऊन अधिक आवाजाच्या पातळीतील डॉल्बी स्टेरिओचा आवाज धोकादायक ठरु शकतो. त्यातही बंद सभागृहातील स्पीकर्स डॉल्बी साउंड अधिक धोकादायक ठरतात. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा रात्रीच्या शांत वातावरणात 70 हून अधिक डेसिबल आवाज अत्यंत हानिकारक ठरु शकतो. लहान बालके, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, हृदय रुग्ण, पॅरालिसीसचे रुग्ण व मनोरुग्णांना 60 डेसिबलहून अधिक आवाजाची पातळी धोकादायक ठरण्याबरोबरच आजार वाढवणारी ठरु शकते. गरोदर मातांच्या पोटातील बाळाच्या अवयवांना धोका पोहोचून वाढीवर परिणाम होऊ शकतो तसेच प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, अशी माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील हृदय चिकित्सा विभाग (कार्डीओलॉजी) विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय बाफना यांनी दिली आहे.

कान, डोळ्यांची काळजी घ्या

हल्ली सण, समारंभादरम्यान डॉल्बी स्टेरिओच्या आवाजाची पातळी 90 ते 100 डेसिबलपेक्षाही अधिक असते. यामुळे कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते तसेच पडद्याच्या आतील हाडांच्या साखळीला किंवा अंतरकर्णातील वाहिन्यांना धोका पोहोचू शकतो. यामुळे तात्पुरते किंवा कायमचे बहिरत्व येऊ शकते. यासाठी डॉल्बी स्टेरिओचा आवाज शक्यतो 80 डेसिबल पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण स्पीकरच्या समोर उभे राहणे टाळणे आवश्यक आहे. तसेच लेझर लाईटमुळे दृष्टी कमी होण्याचा किंवा गमावण्याचा धोका होऊ शकतो. म्हणूनच लेझर लाईट डोळ्यावर पडणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली आहे.

गणेश मंडळांमार्फत सामाजिक प्रबोधनाला प्राधान्य देऊया

गणेशोत्सव, नवरात्र तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या उत्सवातून महापुरुषांचे विचार व त्यांच्या कार्याचा तसेच सामाजिक प्रबोधनपर विषयांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानिमित्त केलेले देखावे पाहण्यासाठी हजारो नागरिक गणेश मंडळांना भेटी देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळे देखाव्यांमधून झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक बंदी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, पाण्याची बचत अशा पर्यावरण रक्षण तसेच सामाजिक एकात्मता, महिला सक्षमीकरण, महिला व बालकांचे कायदे, विधवा प्रथा बंदी, व्यसनमुक्ती, ऐतिहासिक, पुरातन वास्तु आणि गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन अशा विषयांवर जनजागृती करताना तसेच ढोल ताशा सारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करत असल्याचे दिसते. परंतु, देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देखावे तयार करताना पर्यावरणपूरक घटकांच्या वापरावर भर दिल्यास प्रदूषणही रोखले जाईल..

गणेशोत्सव हा अबाल, वृद्धांच्या आनंदाचा.. मांगल्याचा.. जल्लोषाचा सण.. या सणात पारंपरिक वाद्ये, लोककला व साहसी खेळांचे सादरीकरण होण्याबरोबरच सामाजिक प्रबोधनावर आधारीत देखाव्यांवर भर देवुया.. आणि हा सण मोठ्या उत्साहात.. भक्तीभाव, श्रद्धा, आत्मियता आणि आरोग्याची काळजी म्हणून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करुया..!

 – वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *