२७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई, दि 5:- 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पाडण्यात आल्याचे 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

विहित नियमांनुसार मतमोजणी प्रक्रिया

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांननुसार दि 4 जून 2024 रोजी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची मोजणी ही विहित वेळेत म्हणजे सकाळी 8 वाजता सुरु करण्यात आली. ‘ईव्हीएम’ मशीनवरील मतमोजणी साडेआठ वाजता सुरु करण्यात आली फेरीनिहाय मत मोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत उमेदवारांना मिळालेली मते मतमोजणी टेबलवर फॉर्म क्रमांक 17 C भाग 2 मध्ये भरून त्यावर मतमोजणी प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही फेरीत मतमोजणी प्रतिनिधींकडून कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक फेरीअखेर संबंधित फेरीत तसेच फेरीअखेर सर्व उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत जाहीर करण्यात येत होती. यानुसार 25 व्या फेरीची मतमोजणी जाहीर होत असताना टपाली मतपत्रिकांची मतमोजणी संपली, त्यामुळे पंचविसाव्या फेरीची तसेच पंचविसाव्या फेरी अखेरची मतमोजणी जाहीर झाल्यानंतर टपाली मतपत्रिकांच्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये उमेदवार अमोल कीर्तीकर यांना 1501 तर उमेदवार रवींद्र वायकर यांना 1550 मते प्राप्त होती. नियमाप्रमाणे टपाली मतपत्रिकांची संख्या ‘ईव्हीएम’ मतमोजणीच्या सर्व फेऱ्यानंतरची ज्यात बेरीज केली जाते. त्यामुळे 26 व्या फेरीतील मतदान यंत्रांची मतमोजणी संपल्यानंतर 26 व्या फेरीतील 26 व्या फेरीअखेर मतदान यंत्रांच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर असणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात उमेदवार अमोल कीर्तीकर हे 1 मतांनी आघाडीवर होते.

नियमाप्रमाणे 26 व्या फेरीनंतर टपाली मतपत्रिकांची मतमोजणीची संख्या समाविष्ट करून उमेदवारनिहाय मते जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उमेदवार श्री.वायकर हे 48 मतांनी आघाडीवर होते.

टपाली मतपत्रिका पुन:र्परीक्षण

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतमोजणी अखेर जर आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक बाद टपाली मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतःहून सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत बाद टपाली मतपत्रिका पुन:र्परीक्षण करणे बंधनकारक असल्याने व 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात बाद टपाली मतपत्रिकांची संख्या 111 इतकी असल्याने या सर्व बाद टपाली मतपत्रिकांचे पुनर्परीक्षण उमेदवारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. तपासणीअंती टपाली मतपत्रिकांच्या मोजणी संख्येत काहीही फरक पडला नाही.

मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती

यानंतर दोन्ही केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांनी आवश्यक असलेले प्राधिकार दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल तसेच विजयी उमेदवार 7.53 वा जाहीर केला व श्री. कीर्तीकर यांच्या प्रतिनिधींनी 08.06  वाजता पुनर्मतमोजणीचे लेखी पत्र सादर केले. त्यांनी घेतलेली हरकत ही विहित मुदतीनंतर होती तसेच त्यांनी कोणतीही मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया तसेच ‘व्हीव्हीपॅट’ मोजणी दरम्यान कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती असे 27- मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

—–000——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *