दिग्रस येथील कब्रस्तान विस्तारीकरणाची कारवाई तातडीने करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.3  (जिमाका) : दिग्रस येथी कब्रस्तान फार जुने आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे विस्तारीकरणासाठी संपादित केल्या जात असलेल्या जागेचे हस्तांतरण तातडीने करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

दिग्रस येथील विविध विषयांचा श्री.राठोड यांनी महसूल भवन येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, महसूल उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, दिग्रसचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, दिग्रस तहसिलदार, मुख्याधिकारी, दिग्रस येथील मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कब्रस्तानसाठी जागा अपुरी पडत असल्याने अडचणी येतात. त्यामुळे विस्तार करणे आवश्यक आहे. यासाठी 133 आर जमीन संपादीत केली जात आहे. जमीन संपादनाची कारवाई तातडीने केल्या जावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. दिग्रस येथे नवीन स्मशानभूमीजवळ ईदगाहसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

दिग्रस येथे जुन्या पोलिस स्टेशनच्या जागेवर अभ्यासिका बांधण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. सदर जागा पोलिस विभागाची असल्याने पोलिस विभागाने पोलिस कल्याण निधी, लोकसहभाग किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून अभ्यासिका बांधण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे सूचविले. हज यात्रेस मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव जातात. त्यापूर्वी करावे लागणारे लसीकरण दिग्रससह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश आरोग्य विभागास दिले.

दिग्रस येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक तीनच्या विद्यार्थ्यांना बायपास रोड क्रॅास करून जावे लागते. त्यामुळे तेथे तातडीने पर्यायी मार्ग निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. हिबा नामानुसार खरेदी विक्रीचे व्यवहार तहसील व भूमि अभिलेख कार्यालयात करण्यात यावे, अशी मागणी असल्याने त्याबाबत तपासणी करावी तसेच चॅाद नगर येथील लीज पट्टेवाटपाबाबत आवश्यक सूचना केल्या.

दिग्रस शहरातील अल्पसंख्याक घरकुलांचा देखील पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरात 716 घरकुले मंजूर आहे. त्यापैकी 294 घरकुले पुर्ण झाले असून 108 घरांचे बांधकाम सुरु आहे. काही घरांच्या बाबतीत कागदपत्रांची पुर्तता केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिग्रस येथील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या दोन उर्दू शाळा मॅाडेल बनविण्याच्या सूचना केल्या. या शाळांना संगणकांसह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *