‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अधिकाधिक पात्र महिलांनी अर्ज करा -मंत्री आदिती तटकरे

रायगड, दि. १८ (जिमाका):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा शुभारंभ जुलै महिन्यात केला आहे. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही, यासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. पंचायत समिती, मुरुड येथे या याेजनेच्या शिबीर उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोज भगत, माजी सभापती श्रीमती ठाकूर,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) श्रीमती निर्मला कुचिक, तहसीलदार रोहन शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खटाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, की राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत राज्यात 40 लाख अर्ज प्राप्त झाले असून रायगड जिल्ह्यात 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत 2.5 लक्ष  पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत. अर्ज भरणाऱ्या  अंगणवाडीसेविका, आशावर्कर्स यांना प्रत्येकी अर्ज  50  रुपयाचे अतिरिक्त मानधन मिळणार आहे.

यावेळी मंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते बचत गटांना दळण मशिन, मसाला चक्की व स्तनदा मातांना बेबी सिटचे वाटप करण्यात आले व पंचायत समिती आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *