वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. १७ (जिमाका): येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५ एम व्ही ए क्षमतेच्या नवीन उपकेंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी खंडीत होणाऱ्या वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघून वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना अखंड वीज मिळेल, असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे ५ एम व्ही ए क्षमतेच्या नवीन ३३/११ विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन प्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, तहसिलदार आबा महाजन, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, उप अभियंता मिलिंद जाधव, सरपंचा सुशिला कापसे, उपसरपंच जालिंदर कांडेकर, उद्योगपती बाळासाहेब कापसे, वसंत पवार, दिपक लोणारी, मीराबाई कापसे, नवनाथ काळे, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, सुनील पैठणकर, शंकराराव निकाळे, दत्ता जमधडे यांच्यास‍ह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की,  बल्हेगाव, वडगाव आणि नागडे ह्या गाव परिसरातील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना ३३/११ के.व्ही येवला शहर उपकेंद्रातून ११ के.व्ही. अंदरसुल व नगरसुल वाहिनीद्वारे ११ के.व्ही. पुरवठा होत आहे. परंतु रब्बी हंगामात फिडर ओव्हरलोड होत असल्याने विविध कारणाने वीज पुरवठा खंडित होत होता. म्हणून ३३/११ के.व्ही. बल्हेगाव उपकेंद्राची निर्मिती एक आवश्यक बाब म्हणून प्रस्तावित होती.  ह्या उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए.असून याच्या उभारणीसाठी प्रस्तावित खर्च रुपये ३६७.८८ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, बल्हेगाव वीज उपकेंद्रासाठी वडगाव-बल्हे गृप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन त्यांच्याकडील गट नंबर १ / अ मधील ३४ आर जागा महावितरण कंपनीला दिली आहे.

या उपकेंद्रातून १०० एंपीअर क्षमतेचे दोन शेतकीसाठीचे फिडर (१) बल्हेगाव-Ag (२) नागडे-Ag आणि एक गावठाण असे तीन फिडर तयार होतील. या उपकेंद्रातील विजेचा लाभ बल्हेगाव, नागडे आणि धामणगाव येथील गाव व शिवार तसेच वडगाव आणि कोटमगाव येथील गावठाणाच्या परिसरातील घरगुती/ वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना होणार असल्याची माहिती मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.

बल्हेगाव विद्युत उपकेंद्राचे काम येत्या दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. येवला शहरात २१ कोटी निधीतून साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्पाचे सौंदर्यीकरण आधुनिकरित्या करण्यात येणार आहे. यात स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या लढवय्ये व शुरवीरांची माहिती त्यांच्या प्रतिमा फलकासह देण्यात येणार असल्याने त्यांचा इतिहास येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या डोळयासमोर उभा राहील यात शंका नाही असा विश्वासही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म येत्या महिनाअखेरपर्यंत भरून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *