मतदारांसाठी मतदान केंद्रावर मिळणार किमान आवश्यक सुविधा

लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने येत्या 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यावेळी  मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, ग्लास, विविध माहिती फलक, प्रथमोपचार पेटी, आवश्यक फर्निचर यामध्ये आवश्यकतेनुसार लाकडी टेबल, प्लास्टिक खुर्च्या, आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था, स्वच्छता कामगार, मतदारांना रांगेत थांबण्यासाठी सावलीची व्यवस्था, लहान मुलांची खेळणी असलेले पाळणाघर, आवश्यकतेनुसार मार्गदर्शक फलक, मतदान सहायता केंद्र या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

उष्माघातापासून बचावासाठी प्रथमोपचार सुविधा

उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुविधा मंतदान केंद्रांवर राहतील. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यावे, यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रथमोपचार सुविधा राहणार आहे. यामध्ये ताप, जखम, उन्हाच्या त्रासाची लक्षणे आढळ्यास द्यावयाची प्राथमिक औषधी, ओआरएस पावडर आदी सुविधा राहणार आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *