औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा दिवस

छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- निवडणूक कामकाज हे काही फार वेगळे काम नाही. या कामात सजगता अत्यंत महत्त्वाची आहे. हे काम करतांना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज १०८ औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात केले. वंदेमातरम सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले.

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने १०८ औरंगाबाद पश्चित, १०४ सिल्लोड व १०५ कन्नड, १११- गंगापूर व ११२ वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण सत्राचा आजचा दुसरा दिवस होता.

जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी भुसंपादन डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉ. अरुण जऱ्हाड, कन्नड तहसिलदार विद्याचरण कडवकर, तहसिलदार सतिष सोनी,  स्वरुप कंकाळ, नायब तहसिलदार  प्रशांत काळे तसेच साधन व्यक्तिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ज्या लोकशाहीमुळे आज आपणा सर्वांना पद, मान, सन्मान, चरितार्थाचे साधन, अशा सर्व गोष्टी मिळतायेत त्या लोकशाहीची सेवा करण्याची संधी या निवडणूक कामकाजाच्या निमित्ताने आपल्याला मिळते आहे. हे काम सकारात्मक दृष्टीकोन ठेवून करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *